तंत्रज्ञानाचा उपयोग विकास अन् रोजगारासाठी व्हावा : ना. गडकरी

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
 
Nitin Gadakari_1 &nb
 
नागपूर : तंत्रज्ञानाचा उपयोग आपला व्यक्तिगत विकास आणि रोजगार मिळावा यासाठी करता आला पाहिजे. तंत्रज्ञानाला आमच्या जीवनात चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून अनेकांनी रोजगार मिळविला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते शनिवारी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते.
 
 
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, कोरोनामुळे आज देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. सर्वच जण अडचणींचा सामना करीत आहे. स्थलांतरित मजुरांसमोर अडचणी निर्माण झाल्या. बँका तणावात आहे. पण यावर मात करीत आपण पुढे निघालो पाहिजे. हेही संकट संपेल. कोरोनावर प्रतिबंधक लस निघाली की हे संकट संपणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाने घालून दिलेले नियम आणि मर्यादा पाळून व्यवहार करावा. गेल्या दीन ते दोन महिन्याच्या काळात आपण ११५ ई संवादांच्या माध्यमातून सुमारे १५ कोटी लोकांशी संपर्क साधला आहे, असेही ते म्हणाले. आपल्या देशात विविध लहान लहान व्यवसाय करणारे व कौशल्य असणार्या महिला आहेत. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. अशा वेळी महिलांनी उच्च अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार मिळवला पाहिजे. अनेक उद्योजिका आहेत. त्यांनीही तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्पादनाचा दर्जा चांगलाच असला पाहिजे. आकर्षक पॅकेजिंग आणि वेळेत उत्पादन ग्राहकाकडे पोहोचणे या तीन गोष्टीत कोणताही समझोता नको, असेही ते म्हणाले.
 
 
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, डायमंड ज्वेलरी अशा उद्योगात महिलांनी सहभाग घ्यावा. १० लाख ग्रामीण महिलांना आम्ही खादी ग्रामोद्योगाच्या मार्फत सोलर चरखे देणार आहोत. या महिला १५ ते २० हजार रुपये महिना कमावतील, असे सांगताना गडकरी म्हणाले- महिलांना प्रशिक्षित करणे, नंतर रोजगार उपलब्ध करून देऊन मार्गदर्शन करणे व बाजार उपलब्ध करून देणे व त्यांचा उद्योग निर्यातयोग्य उत्पादनांचा बनवणे हे करणे आवश्यक आहे. कौशल्य असलेल्या महिलांनी नवीन उद्योजिका तयार करून स्वत:च्या पायावर त्यांना उभे करून स्वावलंबी बनवा. हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक असलेली सर्व मदत आपण करू असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.