अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये गोळीबार; १ ठार, ११ जखमी

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |

minneapolis-shooting_1&nb 
 
 
मिनियापोलीस : मिनियापोलीसमध्ये आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या एका घटनेमध्ये एक जण ठार झाला आणि ११ जण जखमी झाले. या गोळीबारात १० जणांना गोळ्या लागल्या आहेत आणि अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले . मात्र आढावा घेतल्यानंतर मृत आणि जखमींचा सुधारित आकडा प्रसिद्ध करण्यात आला. या गोळीबारासंदर्भात पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही.
 
 
अपटाऊन मिनियापोलीस या भागामध्ये ही घटना घडली. हा भाग अतिशय गजबजलेला आणि बाजारपेठेचा आहे. या भागात अनेक बार आणि रेस्टॉरंटही आहेत. करोनाच्या साथीमुळे या भागात सहा आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू होता. १ जून पासून प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मर्यादित प्रमाणात पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
 
 
मिनियापोलीसच्या पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेपासून ५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. येथूनच जवळच २५ मे रोजी कृष्णवर्णियांच्या आंदोलनामुळे दंगल उसळली होती. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिनियापोलीसमधील पोलिसांवर जोरदार टीका झाली होती. आज झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांकडून सविस्तर तपशील दिला गेलेला नाही.