कवि कुलगुरू कालिदास - एक रससिध्द कवि

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |

Kavi Kalidas_1  
 
 
जयन्ति ते सुकृतिन: रससिध्दा कवीश्‍वरा:
नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम्
त्या नवरसांनी परिपूर्ण भरलेल्या व काव्य ज्यांच्या घरी पाणी भरते असे ते कविंचे राजे यांचा जयजयकार असो. कारण त्यांच्या काव्यरूपी शरीराला जरा (म्हातारपण),मरणज (मृत्यूपासून निर्माण होणारे) भय (भीती) नसते. असा या संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे हे सुभाषित आपल्या जीवनात जगणारे महाकवि म्हणजे कालिदास हे होत.
 
 
कालिदास संस्कृत भाषेचे एक महाकवि व नाटककार होत. कालिदासांनी आपल्या विषयी स्वत:विषयी आपल्या ग्रंथात कुठेच माहिती दिलेली नाही त्यांचे विश्‍वसनीय चरित्रही उपलब्ध नाही. त्यामुळे कालिदासांच्या स्थलकालाविषयी विव्दांनांत बरेच मतभेद आहेत. चिं.वि. वैद्य, प्रा. र.ना. आपटे, शारदांजन राय इ. विव्दानांनी प्राचीन परंपरेला अनुसरून कालिदास हे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेला, असे मानले आहे.
 
 
ते मानतात की शकारी विक्रमादित्याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी कालिदास हे एक होते. या विक्रमादित्याने सनपूर्व ७५ मध्ये आपल्या नावाचा विक्रमसंवत सुरू केला. उज्जयिनी ही त्याची राजधानी असून कालिदासाचे वास्तव्यही याच नगरीत होते. पण डॉ रा.गो. भांडारकर, म.म. वा.वि. मिराशी इ. पंडितांच्या मते कालिदास हे गुप्त घराण्यातील व्दितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य या राजाच्या आश्रयाला होता. या विक्रमादित्याने इ.स. ३८० ते ४१३ या कालखंडात राज्य केले. कालिदास हे त्याच काळात झाले असले पाहिजेत असे ते म्हणतात.
 
 
कालिदासांच्या कालाप्रमाणेच त्यांच्या स्थलाबाबतसुध्दा विव्दानांमध्ये मतैक्य नाही. बंगाल, ओडीसा, मध्यप्रदेश व काश्मीर या चारी प्रदेशातले लोक आपआपल्या भागात त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. पण मध्यप्रदेश किंवा काश्मीर या दोनच प्रदेशात त्यांचे वसतिस्थान असण्याचा संभव आहे.
 
 
ऋतु संहांरातले वर्णन सुध्दा विशेषत: मध्यप्रदेशातील ऋतूंशीच जुळणारे आहे. मेघदूतात मेघाला मार्ग सांगण्याच्या निमेषाने त्यांने मध्यप्रदेशातील अनेक स्थळांचे व उज्जयिनीचे आत्मीयतेने वर्णन केले आहे. यावरून विव्दानांनी उज्जयिनी हेच कालिदासांचे वास्तव्यस्थान मानले आहे.
 
  
कालिदासांला हिमालयाचे सुध्दा बरेच आकर्षण दिसते. कुमार संभवाचे सर्व कथानक व मेघदूताचा उत्तरार्ध हिमालयाशी संबंध आहे. रघुवंश, शाकुंतल व विक्रमोर्वशीय यामध्ये सुध्दा अनेक ठिकाणी हिमालयाचा संबंध आलेला आहे. म्हणून काही पंडीत कालिदास यांना काश्मिरचा पंडीत मानतात. कालिदासांचा जन्म कदाचित पहाडी प्रदेशात सुध्दा झाला असावा व पुढे ते मध्यप्रदेशात येऊन स्थायिक झाले असावे अशी उभयपक्षी तोड त्यावर सांगता येईल. मध्यप्रदेशात कालिदास हे दीर्घकाळ राहिले असावेत हे नक्की.
 
 
भावकवी, महाकवी व नाटककार या तीनही भूमिका कालिदासांनी सारख्याच यशस्वीतेने वठविल्या आहेत. ऋतु संहार हे निसर्ग वर्णनपर काव्य, मेघदूत हे खंडकाव्य कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये आणि मालविकाग्नि मित्र, विक्रमोर्वशीय व शाकुंतल ही नाटके या त्यांच्या कलाकृती प्रसिध्द आहेत.
 
 
कालिदास हे भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधीक कवी आहेत. त्यांच्या काव्यातला समाज श्रृती-स्मृती प्रतिपादीत नियमांना अनुसरणारा आहे. त्यागासाठी धनसंपदा, सत्यासाठी मितभाषण, यशासाठी जिगीषा आणि कुलपरंपरेचे सातत्य टिकवण्यासाठी संतती अपेक्षिणारा असा तो समाज आहे. या समाजाला त्याने अनेक ठिकाणी दिव्य-जीवनाविषयीचे संदेश जाता-जाता देऊन ठेवले आहे.
 
 
कालिदासाची प्रत्येक कृती त्यागप्रधान प्रेमाची प्रतिष्ठा सांगणारी आहे. त्याग व तपश्‍चर्या यांच्याशिवाय कोणतीच गोष्ट उज्ज्वल घेऊ शकत नाही, असाच जणू कालिदासांचा संदेश आहे. जीवनाची ध्येयभूत पण कठोर आध्यात्मिकता त्यांनी काव्याच्या मखरात बसवून आस्वादनीय आणि विलोभनीय केली आहे. राजा व राज्यपद याविषयी कालिदासाचे विचार-स्मृतिकारांसारखे आहे.
 
 
कालिदासाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यांच्या काव्यात जागोजाग प्रत्ययाला येते. निसर्गाचे अवलोकन करून त्यातील मार्मिक अंश ग्रहण करणे हे कालिदासांचे वैशिष्ट्य आहे. मानव आणि निसर्ग हे जणू त्यांच्या काव्यात एकात्म होऊन पुढे येतात. कालिदासाची प्रतिभा सर्वतोमुखी आहे. त्यांची रसाभिव्यंजक शैली साहित्याचार्यांनी आदर्शभूत ठरविली असून तिला वैदर्भी रीती असे नाव दिलेले आहे.
 
 
वैदर्भी कविता स्वयं वृतवती श्रीकालिदासं वरम्
अर्थ- वैदर्भी कवितेने कालिदास या नवरदेवांना स्वत:होऊन वरमाळ घातली आहे.
कालिदासांच्या काव्यात वाच्यार्थापेक्षा ध्वन्यर्थालाच अधिक महत्व प्राप्त झाले आहे. श्री कालिदास कविंनी आपल्या काव्यात वापरलेले अर्थान्तरंन्यास हे सुध्दा सुटसुटीत पण मोठा आशय व्यक्त करणारे असतात.
उदा. न हीश्‍वरव्याहतया कदाचित पुष्पन्ति लोके विपरितमर्थनम्
अर्थ- महात्म्यांनी वचने कोणत्याही देश-काल अवस्थेत कधीही खोटे ठरत नाहीत.
क्रियाणां खलु धर्म्याणां सत्यपन्यो मूलकारणम्
अर्थ- धार्मिक क्रियांना पतिव्रता स्त्री ही मुख्यसाधन
प्रतिबध्नाति हि श्रेय: पूज्य पूजाव्यतिक्रम:
 
 
पूज्य व्यक्तींच्या पूजेत (श्रेष्ठांना मान देण्यात)जर अतिक्रम झाला, तर तो अतिक्रम करणार्‍या व्यक्तीच्या कल्याणाला प्रतिबंध करतो.
 
 
या आणि अशाच त्याच्या अनेक लोकोत्तर गुणांवर लुब्ध होऊन जयदेवाने कालिदासांना ‘‘कविताकामीनिचा विलास’’ असे म्हटले आहे. बाणभट्टाने कालिदासांच्या काव्याला ‘‘मधुरसान्द्रमंजिरी’’ची उपमा दिलेली आहे. राजशेखराने कालिदासांना रससिध्द कविंच्या अग्रभागी नेऊन बसविले आहे.
 
 
कालिदासांच्या विषयीचे पुढील संस्कृत सुभाषित व अर्थ सांगून मी माझ्या लेखणीला पूर्ण विराम देतो.
पुरा कवीनां गणनाप्रसड्.गे कनिष्ठिकाधिष्ठान कालिदासा:
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव
 
पूर्वी कवींच्या गणनेच्यावेळी कनिष्ठीकेवर (करांगुळीवर) कालिदासांना अधिष्ठान केले गेले पण अद्यापी (अजूनपर्यंत) त्यांच्या तोडीचा कवी निर्माण न झाल्याने पुढची अंगुली जी अनामिका ती खर्‍या अर्थाने अनामिकाच ठरली.
-  व्दारकाधीश दिगंबर जोशी, ९४२०७८७१८८