आयपीएल खेळून क्रिकेटपटू होण्याचे दाखविले स्वप्न!

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
 
 
साडेसहा लाखांचा गंडा : जिवंत पत्नीला दाखविले मृत
 

IPL Dream Crime_1 &n 
 
नागपूर : कुठलाच कामधंदा न करता कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे शक्कलबाज गरजूंना हेरतात. त्यांना जाळ्यात ओढतात. अडकले नाही तर विविध आमिष दाखवितात. अशा अनेक घटना उघडकीस आल्या. अशाच प्रकारची एक घटना अजनी ठाण्यांतर्गत उघडकीस आली. एका ठगबाजाने पैशासाठी चक्क पत्नीलाच मृत असल्याचे दाखविले. एवढेच काय तर आयपीएल खेळून क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न दाखविले अन् लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटित महिलेला ६ लाख ३० हजार रुपयांनी गंडा घातला. अवघ्या ३४ वर्षांच्या वयात मोठा हात मारला. तकिया, भंडारा निवासी रूपेश धुरई ठगबाजीत उतरला. त्याला पत्नी आणि ११ महिन्यांची मुलगी आहे. तो कुठलाच कामधंदा करीत नाही. तरीही कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करतो. त्याने २३ जून २०१९ ते १९ जून २०२० या एक वर्षाच्या कालावधीत घटस्फोटित महिलेची ६.३० लाखांनी फसवणूक केली.
 
 
अजनी हद्दीतील ३२ वर्षीय पीडित महिलेला ९ वर्षांचा एक मुलगा आहे. त्या घटस्फोटित असून जगण्यासाठी बुटिक चालवितात. तरुण असल्याने त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वत:चा तपशील त्यांनी मेट्रो मोनियावर नोंदविला. परिचय देताना त्यांनी काहीच दडवून ठेवले नाही.
 
 
त्याच साईटवर आरोपी रूपेशनेही नोंदणी केली. नोंदणी अर्जात अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. सोबतच केंद्र सरकारच्या कार्यालयात नोकरीला असल्याचे दाखविले. त्याने पीडितेशी संपर्क साधला आणि आपण किती मोठे आहोत, असे भासवून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच त्याने लग्न करण्याचे आमिष दाखविले.
 
 
आपण कार्यालयाकडूनच क्रिकेट खेळत असून आता आयपीएलसाठी निवड झाली आहे. त्यासाठी ५० लाखांची गरज आहे. ४५ लाख रुपये जमविलेत. आता केवळ पाच लाखांची गरज आहे, अशा प्रकारची बनवाबनवी करून पीडितेला पैशाची मागणी केली. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत जमविलेली संपूर्ण पुंजी त्याच्या हवाली केली. मात्र त्याच्याबद्दल अधिक माहिती घेतली असता तो विवाहित असल्याचे समजले. एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे होत गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिला समजले. त्यांनी अजनी ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.