राज्यात टेलि आयसीयूची यंत्रणा बसवण्याचा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |

Rajesh Tope_1   
 
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व मुख्य सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ज्या जिल्ह्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे अशा ठिकाणी टेली आयसीयू ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ना. राजेश टोपे यांनी सांगितले. या यंत्रणेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर हे रुग्णाची प्रकृती पाहून संबंधित रुग्णाच्या उपचारांबाबत स्थानिक डॉक्टरांना योग्य तो सल्ला ताबडतोब देऊ शकतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. या यंत्रणेची सुरुवात मुंबई, नाशिक, जळगाव, अकोला, औरंगाबाद येथून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी यापुढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत बारकाईने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका कमी पडू नये यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा समावेश करून घ्यावा तसेच या रुग्णवाहिका कमीत कमी किमतीच्या असाव्यात या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
 
 
रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी आय.सी.एम.आर.कडून अँटीबॉडी आणि अँटीजन्ट टेस्टला परवानगी मिळाली असून या टेस्ट पुढील काळात सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ड्रग ऑथॉरिटी जनरल यांनी राज्यात सिप्ला व हॅट्रो या दोन कंपन्यांना रेनडेसिबीर आणि ट्रोसिलोझोमा ड्रगची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. अँटी वायरल ड्रग म्हणून यांचा वापर केला जाईल अशी माहितीदेखील राजेश टोपे यांनी दिली.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने रुग्णाला त्याचा रिपोर्ट मिळायला हवा असा निर्णय दिला आहे. आपला रिपोर्ट पाहणे हा प्रत्येक रुग्णाचा अधिकार आहे. याविषयी मुंबई महानरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत आयसीयूचे नवे ५०० बेड पुढील काळात निर्माण करणार असून रुग्णांसाठी बेडची कमतरता भासू नये हाच मुख्य हेतू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.