कुरकुरणार्‍या खाटेवरील वाघ !

    दिनांक : 20-Jun-2020
Total Views |

article_1  H x
 
सरकारमध्ये सहभागी असतानाही धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला विचारात घेतले जात नाही, अशी जाहीर नाराजी व्यक्त करणारे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतात आणि बाहेर येऊन सांगतात की, मुख्यमंत्र्यांबाबत आमची नाराजीच नव्हती. काही विषय समोरासमोर चर्चेचे असतात आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. जनतेचे काही प्रश्न आम्ही मांडले आणि आमचे समाधान झाले. काँग्रेसच्या नेत्यांचे हे घूमजाव किंवा ही सारवासारव, सध्या सरकारचे पालखीचे भोई बनलेल्या काही पत्रकारांना पटली असली, तरी सर्वसामान्य जनतेने मात्र यातून योग्य तो अर्थ काढला आहे.
 
खरे म्हणजे, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना या सरकारविरुद्ध कुरकुर करण्यासाठी तोंडही राहिलेले नाही. कॉंग्रेस हायकमांडचा सक्त विरोध असतानाही, केवळ आणि केवळ राज्यातील नेत्यांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. नेमक्या याच परिस्थितीचा राजकीय फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस उचलत आहे. आता हेच बघा ना, जनतेच्या प्रश्नांवर समोरासमोर चर्चा करण्यासाठी या सरकारमधील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत संधी मिळत नसेल का? खरेतर या बैठकीत जनतेच्याच प्रश्नांची चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. तरीही त्यांना मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर चर्चा करण्याची गरज भासते, यातच सर्वकाही आले आहे. आता काही पत्रकार, यांची चर्चा सफल झाली असे कितीही सांगत असले, तरी लोकांच्या लक्षात आले आहे की, मुख्यमंत्र्यांनी एकतर कॉंग्रेस पक्षाच्या तोंडाला व्यवस्थित पाने पुसली आहेत किंवा काही तरी ठरले आहे, जे बाहेर सांगायचे नाही. या सर्व घडामोडींवरून एक बाब स्पष्ट झाली आहे की, महाआघाडीत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय चुकला आहे. याची जाणीव या पक्षाला झाली आहे. हायकमांडलाही काही सांगायची सोय नाही. कारण, त्यांचा आधीपासूनच विरोध होता. त्यामुळे काँग्रेसला आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यावाचून मार्ग नाही. सत्तारूपी लोण्याचा गोळा कितीही मनमोहक वाटत असला, तरी त्यासाठी भाजपाविरोध हा एकमेव आधार फारच ठिसूळ होता, याचा अनुभव कॉंग्रेसला येत आहे.
हा अनुभव केवळ काँग्रेसलाच येत आहे असे नाही, तर शिवसेनेलाही येत आहे. परंतु, हे सत्य एकवेळ काँग्रेस मान्य करूनही टाकेल, मात्र शिवसेना करणार नाही. कारण, शिवसेनेचा भलत्याच ठिकाणी ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा स्वभाव. काँग्रेसच्या या जाहीर नाराजीचा सार्वजनिक समाचार घेत, शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून काँग्रेसला ‘कुरकुरणारी जुनी खाट’ अशी उपमा दिली. यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या मनावर (ते कितीही जरठ झाले असले तरी) काही ना काही ओरखडे निश्चितच उठले असणार. परंतु, सरकारमध्ये सामील झाल्याचा पश्चात्ताप जाहीरपणे सांगायचा की नाही, या द्विधा मन:स्थितीत काँग्रेसवाले असतील आणि म्हणून सध्यातरी मूग गिळून चूप बसले असतील. कुणी असेही म्हणेल की, जर 44 आमदार असलेलापक्ष कुरकुरणारी काँग्रेस खाट वाटत असेल, तर त्या खाटेवर ‘वाघा’ने झोपावेच कशाला? आम्ही काहीही आणि कितीही िंधगाणा घालू, खाटेने मात्र कुरकुरायचे नाही, असे कसे चालेल? परंतु, सध्या ही मनमानी सहन केली जाईल, अशीच लक्षणे दिसत आहेत. थोरात आणि चव्हाण यांची, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर काँग्रेसची जी भूमिका बाहेर आली आहे, त्यावरून तरी हे असेच दिसत आहे.
 
 
तिकडे शिवसेनेलाही आपण भाजपाची साथ सोडल्याची खंत वाटत असणार. तसे नसते तर, प्रत्येक भाषणात, प्रत्येक प्रतिक्रियेत त्यांनी भाजपावर टीका केली नसती. शिवसेना पक्षप्रमुखांचे कुठलेही भाषण बघा, त्यात भाजपाने विश्वासघात केल्याचा ते आरोप करीत असतात. त्यावर शिवसैनिक किती विश्वास ठेवतात ते माहीत नाही. परंतु, जेव्हा एखादे सत्य लपवायचे असते तेव्हा त्या सत्यावर घातलेले आवरण वारंवार झटकावे लागत असते. त्या आवरणातून सत्य कुठे बाहेर डोकावत तर नाही ना, याची खात्री करायची असते. भाजपाने विश्वासघात केला ना, त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्र्याची गादी मिळाली ना, मग आता वारंवार ‘विश्वासघाता’चा जप कशापायी? शरद पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याने खांदा दिला आहे, त्याचा वापर करून शिवशाही (एसटी बस नाही) की काय म्हणतात ते राज्यातील जनतेला दाखवून देण्यासाठी धडपड करायला हवी. परंतु, ते होताना दिसत नाही. आताही पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विश्वासघाताचा आरोप केला आहे. या अशा विश्वासघाताचा आघात जनतेने किती सहन करायचा? असे आघात करता करता, आपल्या सरकारलाच कुठे घातपात तर होत नाही ना, हेच बघावे म्हणजे झाले! आपले सरकार ‘गोिंवदबाग’ व ‘सिल्व्हर ओक’मधून चालत आहे की ‘मातोश्री’तून, याकडेही सरकारप्रमुखाने मधूनमधून डोळे उघडे ठेवून बघत राहिले पाहिजे.
 
 
तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वेगळेच नाटक सुरू आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा राजू शेट्‌टी गोत्यात सापडले आहेत. त्यांच्याही पक्षात कुर्‍हाडीचा दांडा गोत्याचा काळ बनला आहे. शरद पवारांनी दाखविलेल्या आमिषाला राजू शेट्‌टी अलगद बळी पडले आणि ज्या गोिंवदबागेसमोर आंदोलन करून शरद पवारांना सळो की पळो करून सोडले, त्याच गोिंवदबागेत आमरस-पुरीच्या मेजवान्या झडल्या म्हणे! पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा पाया उखडून लोकांच्या मनात पवारांबद्दल अविश्वास निर्माण करणारे राजू शेट्‌टी, एका आमदारकीसाठी एवढे लाचार होतात, हे दु:खद आहे. कदाचित, शेतकर्‍यांची चळवळ रस्त्यांवर उतरून लढण्यापेक्षा, सत्तेच्या उबदार सावलीतून लढणे सोपे आणि प्रभावी असते, याचा त्यांना साक्षात्कार झाला असावा. परंतु, ही उबदार सावली, आतापर्यंत आपल्याला घट्‌ट धरून असलेल्या एखाद्या प्रामाणिक व लायक कार्यकर्त्याला का म्हणून द्यायची नाही? अनेकदा खासदारकी भोगूनही पुन्हा आमदारकीसाठी गुडघ्याला बािंशग बांधून राहण्याचा लोभ शेट्‌टींना का म्हणून सुटावा? आधीच आपल्या पक्षाला कार्यकर्ते सोडून जाण्याची गळ लागली असताना, त्याला असल्या मोहापायी मोठे भगदाड पाडण्याची बुद्धी सुचणे, ही विनाशकालाची चाहूल तर नाही ना! शरद पवारांच्या अशाच जाळ्यात अडकून शरद जोशींनी आपल्या संघटनेची वाताहत करून घेतली, हा इतिहास इतका काही प्राचीन झालेला नाही. इतिहासापासून शिकायचे असते, ते यासाठीच.
 
 
शेवटी काय, भाजपाविरोधाचा मुलामा लावलेल्या या सरकारचे पोपडे निघणे सुरू झाले आहे. शिवसेनेचीही स्थिती ढासळलेल्या भिंती, खचलेले बुरूज असलेल्या गढीसारखी झाली आहे. काँग्रेस पक्ष कुरकुरणारी जुनी खाट झाली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, कोरोनाची महामारी हाताळण्यात जी हयगय झाली व त्यामुळे मुंबईचा जो िंधगाणा झाला आहे, त्याचे खापर आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर न येता ते मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर कसे फोडायचे, या िंचतेत आहे. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी, ‘भाजपाविरोधा’च्या गोंदाने एकमेकांना चिकटलेल्या या तीनही पक्षांना, कोरोनाची महामारी आपल्या गळ्यात एखाद्या काट्याप्रमाणे रुतून बसेल, असे स्वप्नातही वाटले नसेल. हळूहळू या गोंदाची शक्ती क्षीण होत जाणार आणि ‘कोरोना महामारी’चे अपयश मुख्यमंत्र्यांच्या माथी मारण्याची पुरेपूर तयारी आणि खात्री झाली की, या सरकारचे भवितव्य आणि महाराष्ट्रातील राजकारण काय असेल, हे सांगण्यास कुण्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही. मग कुरकुरणारी खाट बोचू लागणे, खचलेल्या गढीवरचा भगवा खटकू लागणे आणि गोिंवदबागेचा जाच वाटू लागणे सुरू होईल. परंतु, तोपर्यंत महाराष्ट्राचे राज्य गाळात किती फसलेले असेल, याची कल्पना आताच करता येणार नाही. जनादेशाचा अपमान केल्यानंतर एखाद्या राज्याची किती ससेहोलपट होते, याचे एक उदाहरण मात्र हे राज्य निश्चितच सर्वांसमोर ठेवेल, यात शंका नाही!