‘महाभारत’मधील इंद्रदेव आता राहतोय वृद्धाश्रमात !

    दिनांक : 20-Jun-2020
Total Views |
 
 
सध्या लॉकडाऊन असल्याने दूरदर्शनवर बी.आर. चोपडा यांच्या महामेगा ‘महाभारत’ सिरियलचे पुन्हा प्रसारण करण्यात येत असून या ऐतिहासिक सिरियलमध्ये काम करणारे सर्वच कलाकार यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. आज अशाच एका पात्राबद्दल म्हणेजच सतीश कौलबद्दल जाणून घेऊया... हे तेच सतीश कौल आहेत जे पंजाबी चित्रपटातील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जातात.
 
 
एक काळ असा होता की, जेव्हा सतीश हिंदी आणि पंजाबी चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेे होते. त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती होती. त्याकाळी मोठमोठे प्रोड्यूसर्स त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रयत्न करीत असायचे. सध्या मात्र सतीश कौल यांची स्थिती खूपच खराब असून ते दयनीय अवस्थेत वृध्दाश्रमात आयुष्य व्यतीत करीत आहेत.चित्रपट कारकीर्दीत त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटातून आपल्या अभिनयाचे दर्शन घडविले होते.
 
B R CHOPDA_1  H
 
त्यांनी करियरची सुरूवात केली 1979 मध्ये. सुरूवातीला त्यांनी अनेक हिट पंजाबी चित्रपट दिले. त्यानंतर हिंदी चित्रपटात देखील ते सक्रिय राहिले. ‘कर्मा’, ‘आंटी नंबर वन’, ‘प्यार तो होना ही था’, ‘प्यार का मंदिर’, ‘खुनी महल’ यासारख्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आनंदित केले. सतीश कौल यांनी 300 हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटातून काम केले आहे.
 
 
महाभारत मालिकेत देवराज इंद्र
महाभारत मालिकेत देवराज इंद्र ही भूमिका त्यांनी जिवंत केली. चित्रपटानंतर सतीश कौल यांनी टीव्हीवर वेगळ्याच अंदाजात एंट्री केली होती. ‘महाभारत’मध्ये हे तेच इंद्र आहेत, ज्यांनी ब्राह्मण वेश धारण करून दानवीर कर्णाकडून त्याची कवचकुंडले मागून घेतली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरल्याने प्रेक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यांनी एका मुलाखतीत चित्रपटातून टीव्हीवर येण्याचे कारण सांगितले होते. ते म्हणाले होते की, खरे तर 80 च्या दशकात दहशतवाद खूपच फोफावल्याने त्यांचे फिल्मी करियर उतरणीला लागले होते. त्यांनी ‘विक्रम आणि वेताळ’मध्ये देखील भूमिका केली होती.
 
महाभारताशिवाय सतीश कौल यांनी अनेक गाजलेल्या टी.व्ही. शोच्या माध्यमातून दमदार भूमिका साकारल्या होत्या. यात रामानंद सागरची विक्रम आणि वेताळ सिरीयल सर्वाधिक प्रसिध्दीस आली होती. यात सतीश कौल यांनी युवराज आनंदसेन, प्रिंस अजय, मधुसूदन, वैद्य, सत्वशील, राजकुमार वज्रमुक्ती, सेनापती आणि सूर्यमलसहित अनेक भूमिका साकारल्या होत्या. करोडपतीपासून रोडपती बनलेले सतीश कौल यांनी आपल्या आयुष्याची कमाई लुधियानातील एका अ‍ॅक्टिंग स्कूलवर खर्च केली आहे. दुर्दैव असे की, त्यांचे हे अ‍ॅक्टिंग स्कूलही अत्यंत बिकट स्थितीत अखेर बंद पडले आणि त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर त्यांना पाणी सोडावे लागले. सध्या ते वृध्दाश्रमात उर्वरित आयुष्य व्यतीत करीत
आहेत.