गलवान संघर्ष हा चीनचा पूर्वनियोजित कटच

    दिनांक : 18-Jun-2020
Total Views |
  • चूक सुधारा, अन्यथा संबंध बिघडतील
  •  जयशंकर यांचा स्पष्ट इशारा
 
news_1  H x W:
 
नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोर्‍यातील सद्य:स्थिती बदलण्यासाठी आणि भारतीय भूभाग हडपण्यासाठीच चीनने सोमवारी मुद्दाम संघर्ष घडविला आहे. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता. आपली चूक सुधारा अन्यथा दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याचीच शक्यता जास्त आहे, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी चीनला दिला.
 
गलवान संघर्षाच्या पृष्ठभूमीवर जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेत जयशंकर यांनी अतिशय कठोर शब्दात चिनी सैनिकांच्या कृत्याचा निषेध केला. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध अतिशय चांगले आहेत. ते अधिक मजबूत करण्यावर आम्ही भर दिला आहे. तुमच्याकडूनही आम्हाला तीच अपेक्षा आहे. शांतता चर्चा सुरू असताना, आपण नेमके कुठे चुकलो, यावर आत्मपरीक्षण करा आणि चूक सुधारा, अशा शब्दात त्यांनी चीनला सुनावले.
 
 
तुमच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यामुळे प्रत्युत्तर देणे त्यांना भाग पडले. तुमच्या सैनिकांच्या विश्वासघाती कृत्यामुळेच हा संघर्ष झाला आणि यासाठी फक्त चीनच जबाबदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांच्यात आतापर्यंत झालेल्या अनेक बैठकांमधून महत्त्वाचे करार झाले आहेत, त्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी केवळ आमची एकट्याची नाही, तुमची देखील आहे, अशी आठवण जयशंकर यांनी यावेळी करून दिली.
 
 
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असताना, सीमेवर शांतता प्रस्थापित होत असताना, तुमच्या सैनिकांनी गलवान भागात बांधकामाला सुरुवात केली. हा भाग भारताचा आहे, याचा विसर तुम्हाला कसा पडला. हा वाद चर्चेतून सोडवला जात असताना, संघर्षाची भूमिका घेण्याची गरज का होती. हा सर्व पूर्वनियोजित कटाचाच भाग असल्याचा आमचा ठाम आरोप आहे, असे ते म्हणाले.