आपण नक्कीच जिंकू!

    दिनांक : 18-Jun-2020
Total Views |

modi_1  H x W:
 
 
कोरोना नावाचा एक अतिसूक्ष्म विषाणू, मात्र त्याने सार्‍या भारतातच नव्हे, तर जगात हलकल्लोळ माजवून ठेवला आहे. चीनमध्ये 2019 सालच्या डिसेंबर महिन्यापासून पसरलेल्या या विषाणूने प्रत्यक्षात 2020 सालच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून जगातही पाय पसरणे सुरू केले होते. भारतातही त्याने आधी चोरपावलाने प्रवेश केला आणि नंतर मात्र तो शिरजोर झाला. त्याला जास्त शिरजोर होता येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आणि तो जाहीरही केला. कधी नव्हे ते विमानांपासून रेल्वेपर्यंतची संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. सर्व उद्योगधंदे बंद झाले. हातावर कमावून पानावर खाणार्‍यांचे हाल झाले. पाहता पाहता तीन-चार महिने निघून गेले. या सर्व पृष्ठभूमीवर पंतप्रधानांनी नुकतेच राजधानी दिल्लीतून देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संबोधित केले आणि लवकरच भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे संकेत दिले. पंतप्रधानांच्या या विधानाने तात्पुरता का होईना, मुख्यमंत्र्यांसह देशवासीयांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या या विधानामुळे आणि विद्यमान परिस्थिती पाहता, नक्कीच अर्थव्यवस्थेच्या गाडीची मंदावलेली चाके लवकरच धडधडू लागतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. नुसत्या शब्दाने नव्हे, तर लवकरच देशवासीयांना अर्थव्यवस्थेच्या बाबतीत नक्कीच दिलासा मिळेल, असेही आता मनोमन वाटू लागले आहे.
 
 
सुरुवातीला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याची तीव्रता आणि पडसाद लोकांना जाणवले नव्हते. मात्र, त्याची जाणीव जेव्हा होऊ लागली तेव्हा देशाच्या कानाकोपर्‍यांत किंवा महानगरात वास्तव्याला असलेल्या मजूर आणि कामगारांचे सहपरिवार लोंढेच्या लोंढे आपापल्या गावाकडे परतू लागले होते. त्याचाही एक आर्थिक भार राज्य आणि केंद्र सरकारला सहन करावा लागला होता. लॉकडाऊनमुळे देशातील सारेच व्यवहार ठप्प झाले होते. अतिआवश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सारेकाही बंद होते. त्यामुळे रोजगाराचा, घरभाड्याचा आणि खाण्यापिण्याचा, शिवाय स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे, हे मजूर आणि कामगार गावाकडे परतले होते. आता मात्र चार लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने ‘अनलॉक-1’ जाहीर केले, त्यामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणे सुरू झाले आहे. एवढेच नव्हे, तर उद्योगधंद्यांना सुरू करण्याची परवानगी मिळाल्यामुळे तसेच वाहतुकीच्या संदर्भातील नियमही शिथिल केल्यामुळे हे मजूर आणि कामगार पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून सुमारे 30 ते 40 लाख मजुरांनी गावाकडे प्रस्थान केले होते, त्यापैकी दीड लाख पुन्हा मुुंबईत परतले असल्याची माहिती आहे.
 
 
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टप्प्यांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पहिल्या टप्प्यात त्यांनी, कोरोचा प्रभाव जास्त नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत, तर दुसर्‍या टप्प्यात ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तेथील मुख्यमंत्र्यांसोबत विचारांचे आदानप्रदान केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या गाडीची गती पुन्हा एकदा हळूहळू का होईना वेग पकडू लागेल आणि ही गाडी पुन्हा एकदा रुळावर आपल्या नेहमीच्या गतीने धावू लागेल, असा विश्वास व्यक्त केला. उद्योगधंद्यांप्रमाणेच अर्थव्यवस्थेचा कणा असलेली वाहतूक व्यवस्थाही सुरू झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुुकीला काही नियम-अटींवर सुरुवात करण्यात आली आहे. आंतर जिल्हा व राज्य प्रवेशाची वाहतुकीसाठी असलेली बंदीही उठविण्यात आली आहे. त्यामुळे, लहान-मोठ्या व्यावसायिकांसह, मजूर-कामगार तसेच अडकून पडलेल्या कुटुंबीयांच्या सदस्यांना दिलासा मिळाला; नव्हे, त्यांनी त्याचा फायदा घेऊन आपापले घर गाठले. ‘वंदे भारत’ योजनेच्या माध्यमातून विदेशात अडकून पडलेल्या लोकांनाही मायदेशी परत येता आले आहे.
 
 
उद्योगधंदे, वाहतुकीप्रमाणेच आता बाजारपेठाही गजबजू लागल्या आहेत. त्यामुळे हातावर कमविणारे लहान व्यावसायिकही काही अंशी का होईना सुखावले आहेत. अनेकांची रोजी-रोटी सुरू झाली आहे. शिवाय शेती करणार्‍यांनाही फार मोठा लाभ झाला आहे. या लॉकडाऊनच्या काळात शेतीतून उत्पादित झालेल्या मालाच्या मागणीत वाढ झाली होती. ज्यांचे इतर व्यवसाय ठप्प पडले होते, त्यांनी भाजीपाल्याची दुकाने थाटली. लॉकडाऊनचा प्रदूषणावरही सकारात्मक परिणाम झाला आहे. मान्सूनचेही धडाक्यात आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. यंदा खरिपाचे पीक 10 ते 20 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपले 52 टक्के आर्थिक व्यवहार हे शेतीवर अवलंंबून आहेत. त्यात सध्यातरी कोणताही फरक पडला नसल्यामुळे या पातळीवर फार मोठे नुकसान होईल, असे वाटत नाही. शिवाय बांधकाम व्यवसायाला परवानगी देण्यात आली असल्यामुळे हळूहळू त्यांचीही गाडी रुळावर येईल, असे वाटते. ऑटोमोबाईल व्यवसायालाही लॉकडाऊनचा फटका बसला असे बोलले जात असले, तरी मार्च महिन्याच्या आकडेवारीची माहिती लक्षात घेता, या व्यवसायात अवघी 30 टक्केच घसरण दिसून आली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत 70 टक्के वाहन विक्री झाली असल्याची माहिती आहे. आगामी काळात चारचाकी आणि दुचाकीला पुन्हा एकदा मागणी वाढेल आणि ही 30 टक्क्यांची तूट भरून निघेल आणि आहे त्यापेक्षा जास्त व्यवसाय होईल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
 
 
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी विविध क्षेत्रात कौशल्याधारित मजुरांची व कामगारांची सुरुवातीच्या काळात चणचण भासणार आहे. मात्र, कोरोनाच्या सावटाची गाडी जसजशी मंदावेल तसतशी अर्थव्यवस्थेची गाडी गती पकडेल, असे वाटते.
 
 
देशाला आणि देशवासीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचा रोजगाराचा प्रश्न, रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारचीही मनोमन इच्छा आहे. त्यामुळे ही दोन्ही सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अशातच पहिल्या टप्प्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनीही, आपण जेवढ्या लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवू तेवढ्याच लवकर आपल्याला अर्थव्यवस्था आणखी मोकळी करून रोजगाराच्या संधी वाढविता येणार आहेत, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी काही बाबतीत संकेत दिले असले, तरी आता बहुतांश प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना देण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची आहे. कारण, सरकारने थोडी ढील काय दिली, बोट काय पुढे केले, तर हात पकडणेच सुरू करण्यात आले आहे. जसेकाही कोरोना नावाचे संकट देशातून समूळ नष्ट झाले, अशा पद्धतीने लोकांकडून व्यवहार व वर्तणूक करणे सुरू झाले आहे. रस्त्यांवरची आणि बाजारपेठांमधील गर्दी वाढू लागली आहे. तोंडावर जरी मास्क दिसत असले, तरी भौतिक दूरतेचा सर्वत्र फज्जा उडालेला दिसत आहे. ‘आपल्या भागात कोरोना कुठे आहे!’ अशा तोर्‍यात लोक बिनधास्त बाहेर पडू लागले आहेत. कामाशिवाय अवांतर भटकणेही सुरू झाले आहे. बेशिस्तीत वागणारे लोक हे विसरले की, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, एकटदुकट का होईना कोरोनाला लोक बळी पडत आहेत. कधी कोणत्या भागात कोरोनाबाधित आढळून येईल, याचा काही नेम नाही. आपल्या आजूबाजूलाही असा बाधित राहू शकतो, याची जाणीव ठेवून देशवासीयांनी, सरकारने बांधून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून राज्य आणि केंद्र सरकारला पाठबळ दिले, तर या देशातून कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. मास्क लावणे आणि भौतिक दूरता पाळणे, या दोन साध्या नियमांचेही आपण पालन केले, तर पंतप्रधान मोदी यांनी अर्थव्यवस्था रुळावर येण्याबाबत व्यक्त केलेला विश्वास दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा फायदा अर्थातच देशवासीयांनाच होणार आहे...