हीच निर्णायक वेळ!

    दिनांक : 17-Jun-2020
Total Views |

india_1  H x W:
 
सीमेवरील तणाव हा चीनने वाढविला आहे. जाणीवपूर्वक वाढविला आहे. सोमवारी गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जी झटापट झाली, त्यात भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेत. त्याचप्रमाणे चीनचे पाच सैनिकही मारले गेल्याची बातमी दोन देशांमधील तणाव आणखी वाढविणारी आहे. सीमेवर गोळीबार झाला नसतानाही, आपले तीन सैनिक शहीद कसे झालेत आणि चीनचे पाच मारले कसे गेलेत, हा प्रश्नच आहे. एकीकडे वाटाघाटी करून प्रश्न सोडवू असे म्हणायचे आणि दुसरीकडे आपल्या सैनिकांना भारतीय सीमेत घुसायला सांगायचे, ही चीनची दुटप्पी भूमिका वेळीच ओळखून भारत सरकारने अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने कुठल्याही परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवू नये. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करीत भारतावर युद्ध लादणारा चीन विश्वासघातकी आहे. त्यामुळे भारताने आता निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे. हीच योग्य वेळ आहे. अमेरिकादी देश चीनविरोधात एकवटले असताना, मुत्सद्देगिरीचा परिचय देत भारताने चीनविरोधात ताकद एकवटून चीनला नामोहरम केले पाहिजे. ग्लोबल टाईम्स हा चीनचा जबरदस्त वृत्तप्रसारण प्रकल्प आहे आणि याच ग्लोबल टाईम्सने चीनचे पाच सैनिक मारले गेल्याची कबुली देणे, ही भारताच्या दृष्टीने मोठी गोष्ट मानली पाहिजे. कुठेतरी चीनवरही आता दबाव वाढला असल्याचेच हे निदर्शक आहे. असे असले तरी भारत सरकारने सर्व आघाड्यांवर सतर्क राहात चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत परिस्थिती गांभीर्याने हाताळली पाहिजे.
 
 
शेजारच्या चीनने सध्या कारण नसताना भारताच्या खोड्या करणे सुरू केले आहे. कोरोना व्हायरस जन्माला घालून आणि त्याचा जाणीवपूर्वक जगभरात प्रसार करून आता चीन स्वत:च निर्माण केलेल्या चक्रव्यूहात फसला आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना चीनने मुद्दाम भारताशी सीमावाद उकरून काढला आहे. कोरोनाच्या मुद्यावरून एकाकी पडलेला चीन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी आणि जागतिक समुदायाचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी ठरवून भारताशी भांडण करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे. डोकलामच्या वेळी चीनने जे धोरण अंगीकारले होते, तशीच वागणूक यावेळीही दिसून येत आहे. तणाव निर्माण करायचा, संबंध ताणून धरायचे आणि परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण करून आपला दुष्ट हेतू साध्य करायचा, हा चीनचा डाव दिसतो आहे. चीनला जेरीस आणणे भारताच्या दृष्टीने सोपे नसले तरी कठीणही नाही. पण, तरीही सध्या जी कूटनीती वापरली जात आहे, तिचा तत्काळ परिणाम येणे कठीण आहे. वेळ लागेल. आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल. डोकलामच्या वेळी आपण जी भूमिका घेतली होती आणि चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते, तसेच यावेळीही करावे लागेल. पण, त्याच वेळी थोडा संयमही ठेवावा लागेल.
तणावाचा जो स्तर आहे, तो वाढता ठेवत राजकीय-आर्थिक सौदेबाजी करून भारताला नामोहरम करण्याचे चीनचे षडयंत्र आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या 40 वर्षांत कधीही गोळीबार झालेला नसला, तरी भविष्यात होणारच नाही, याची कुठलीही शाश्वती नाही. चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. सध्या अमेरिकेसह अनेक देशांनी चीनविरोधी भूमिका घेतल्याने चीनची अडचण झाली आहे. त्यातच कोरोना व्हायरसबाबत जगाला वेळीच सतर्क का केले नाही, याचेही उत्तर चीनकडे नाही. त्यामुळे भारतासारख्या सोशीक देशाला त्रास देऊन, युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून जगाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा चीनचा डाव ओळखून भारताने चीनचा कसा मुकाबला करायचा, याबाबत दिशा निश्चित केली पाहिजे. आपल्या व्यापारावर कुठलाही विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था रुळावरून घसरू नये, हा चीनचा स्वार्थ आहे. त्यातून चीनने कुरापती सुरू केल्या आहेत, हे भारताला आणि जगाला कळणार नाही, या भ्रमात चीन राहणार असला, तरी चीनचा मुकाबला करणे वाटते तेवढे सोपेही नाही.
 
 
चीनशी मुकाबला करताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. कुठल्या आघाडीवर कसे लढायचे, याबाबत एकदम मजबूत असे नियोजन करावे लागणार आहे. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐक्य होत असल्याचे चीनला खुपते आहे. त्यामुळे असे ऐक्य होऊ नये आणि भारताने अमेरिकेशी हातमिळवणी करू नये, या दृष्टीने दबाव आणला तर भारत दोन पावलं मागे जाईल, असे चीनला वाटते आहे. त्यातूनच चीनने सीमेवर सैन्य जमा करून, काही सैनिकांना लडाखमध्ये घुसवून तणाव वाढवला आहे. अमेरिकेसोबत जे शीतयुद्ध सुरू झाले आहे, त्यात भारताने पडू नये, असा सूचक इशारा चीनने भारताला दिला आहे. चीनने अप्रत्यक्ष धमक्याही दिल्या आहेत. हा चीनचा मूळ स्वभावच आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढताना दिसत असताना, चीनने लडाखच्या सीमेवर सैन्य आणून काहींना भारतीय सीमेत घुसवत जी खोडी काढली आहे, ती भारताने सामान्य समजता कामा नये. काहीही करून भारतावर दबाव वाढवायचा आणि अमेरिकेपासून दूर करायचे, हा चीनचा डाव स्पष्टपणे लक्षात येणारा आहे. चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ ही जी योजना तयार केली आहे आणि त्यावर जे काम केले आहे, त्यात भारताकडून बाधा आणली जाऊ नये, आपला ग्वादर रोड सुरक्षित राहावा यासाठी चीनची सगळी धडपड सुरू आहे. भारताशी युद्ध करून तसा चीनला कोणताही फायदा होणार नाही, हे चीनलाही माहिती आहे.
 
 
अमेरिकेसोबत गेल्यास काय परिणाम होतील, हे भारताला सांगण्यासाठीच चीनने लडाखला लागून असलेल्या सीमेचा वाद उकरून काढला आहे. भारत सरकारने कलम 370 रद्द करून एक मोठे पाऊल उचलले होते. आता भारताचा भविष्यात असा प्रयत्न राहील की, व्याप्त काश्मीरचा प्रदेश, जो आधी आपलाच होता, तो परत मिळवायचा. नेमके हेच चीनला नको आहे. पण, चीन भारताची भूमिका, बाजू आणि भावनाच समजून घ्यायला तयार नाही. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जी सीमारेषा आहे, ती नव्याने चिन्हांकित करण्यासाठी भारताने अनेकदा पाठपुरावा केला. पण, चीनकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. व्यापारात जे असंतुलन आहे, ते दूर करण्याबाबतही भारताने अनेकदा आवाहन केले आहे. पण, त्यालाही चीनकडून सकारात्मक प्रतिसाद कधी मिळाला नाही. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला घेरण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, त्याबाबतही भारताने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. पण, त्याची तरी चीनने कुठे दखल घेतली? नाहीच घेतली. तरीही भारताने कधी युद्धाची भाषा केली नाही. समुद्री सीमांवरही चीनने कायम भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्रास आजही तसाच दिला जात आहे. तरीही भारताची भूमिका संयमाचीच राहिली आहे. पण, भारतीय सैनिकांनी धाडसाचे प्रदर्शन करीत डोकलाम येथे चिनी सैनिकांना मागे हटण्यास बाध्य केले होते, याचा विसर चीनला पडला असावा कदाचित. भारताकडून काही प्रतिक्रिया दिली जात नाही याचा अर्थ असा नाही की, भारत कमजोर आहे.
 
 
चीनने भारताच्या संयमाची फार परीक्षा पाहू नये. भारताकडून लडाखच्या सीमेंतर्गत रस्त्यांची जी कामे केली जात आहेत त्याला चीनचा आक्षेप आहे. पण, हा आक्षेप वरवरचा आहे. प्रत्यक्षात चीनच्या मनात वेगळीच भावना आहे. भारताने आपल्या धोरणांमध्ये जे बदल केले आहेत, व्याप्त काश्मीरसाठी जी भूमिका घेतली आहे, त्यामुळे चीन बिथरला आहे. 1993 आणि त्यानंतर जेवढे करार झालेत, त्यात सीमेवर शांतता कायम राखावी, यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. मात्र, भारताने प्रयत्न करूनही सीमारेषा चिन्हांकित करण्यासाठी चीनने कधीही सहकार्य केले नाही, हे वास्तव आहे. काहीही असले आणि काहीही झाले, तरी भारतासाठी आता ही निर्णायक वेळ आहे. हिमालयातील सीमांची सुरक्षा हा आता केवळ भारताने एकट्याने लढण्याचा प्रश्न राहिलेला नाही. स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो, हे आता जगाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे निरंकुश होत चाललेल्या चीनच्या मुसक्या आवळणे, ही आता जागतिक समुदायाची प्राथमिकता बनली पाहिजे, एवढेच यानिमित्ताने सुचविता येईल...