राज्यांशी बोलून आपात्कालीन योजना तयार करा

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |
 पंतप्रधान मोदींचा अधिकार्‍यांना निर्देश

modi_1  H x W:  
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ मंत्री आणि अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील एकूण कोरोना स्थितीचा आणि आगामी दोन महिन्यांमधील तयारीचा आढावा घेतला. सर्व राज्यांशी चर्चा करून, आपात्कालीन योजना तातडीने तयार केली जावी, असा निर्देश पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना दिला.
 
 
ज्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे, तेथील आजची स्थिती आणि भविष्यातील तयारीची सविस्तर माहिती प्राप्त केली. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी यावेळी भर दिला.
 
 
कोरोनाविरोधी लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे, त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी सर्व राज्यांनी घ्यायलाच हवी, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
 
 
अधिकार्‍यांनी केले सादरीकरण
या बैठकीत अधिकार्‍यांनी देशातील कोरोनाच्या सद्य:स्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे काय उपाययोजना केल्या जात आहेत, कोरोना चाचण्यांची गती किती प्रमाणात वाढविण्यात आली आहे, आदी विषयांवर मोदींपुढे सादरीकरण करण्यात आले. काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाल्याने तिथे नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय सचिव, आरोग्य सचिव आदी उपस्थित होते.