आत्मनिर्भर होणे म्हणजे काय?

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

modi_1  H x W:  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर जोर देत आहेत. त्यांच्या प्रत्येक संवादात या संकल्पनेचा उल्लेख असतो आणि त्याचे विविध पैलू ते उलगडत असतात. आधी त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ असा नारा दिला होता. स्थानिक वस्तूंचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारतीयांनी सक्रिय व्हावे, असा त्यात संदेश होता. आता परवा बोलताना ते म्हणाले- आत्मनिर्भर भारत अभियानाचा सरळ-साधा अर्थ आहे की, भारताने दुसर्‍या देशांवरील आपली निर्भरता कमीतकमी करावी. जी वस्तू आयात करण्यास आम्ही विवश आहोत, ती भारतातच कशी निर्माण होईल, भविष्यात याच वस्तूंचा भारत निर्यातदार कसा बनेल, या दिशेने आम्हाला अधिक वेगाने कार्य करायचे आहे. मोदींच्या या स्पष्टीकरणात कुठेही नकारात्मक भाव नाही, हे आम्ही समजून घेतले पाहिजे.
 
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प सोडताच, भारतात ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ असे अभियान छेडण्यात आले आहे. जे जे काही चिनी आहे, ते न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतावरील विवेचनातून हा असला अर्थ कुठल्याही कोनातून निघालेला दिसत नाही. चिनी वस्तूंवर बहिष्कार, ही घोषणा भारतीय मानसाला हुरळून टाकणारी असली, तरी ती सद्य:परिस्थितीत नकारात्मक समजली जाईल. पंतप्रधानांनाही ते अपेक्षित नसावे. म्हणूनच त्यांनी ‘स्व-निर्भर’ किंवा ‘स्वावलंबी’ असे विशेषण न वापरता ‘आत्मनिर्भर’ हा शब्द योजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ राजकारणी नाहीत, तर प्रतिभासंपन्न विचारवंतही आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून, भाषणातून ते जे विचार मांडतात किंवा ज्या संकल्पना प्रसृत करतात, त्यामागे फार मोठा गहन अर्थ असतो, एक सखोल पृष्ठभूमी असते. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे पैलू विचारात घेताना या व्यापक, सखोल पृष्ठभूमीचाही आम्ही विचार केला पाहिजे.
 
 
आत्मनिर्भर म्हणजे आत्म्यावर विसंबून असणारा आणि आत्मनिर्भर भारत म्हणजे आत्म्यावर विसंबून असणारा भारत. हा आत्मा काय आहे, हे लक्षात घेतले नाही तर मोदींच्या या संकल्पनेचा परिपूर्ण आशय समजून घेता येणार नाही. हे निश्चितच आहे की, हा आत्मा भारताचा आहे. म्हणजे स्वत:च्या आत्म्यावर विसंबून, निर्भर असणारा भारत, नरेंद्र मोदींना अभिप्रेत आहे. आता भारताचा आत्मा काय, हे समजून घ्यावे लागणार आहे. याबाबतीतही आपल्याकडील वैचारिक परिघात प्रचंड गोंधळ आहे आणि तो वामपंथी मंडळींनी व्यवस्थित पेरून ठेवला आहे. मुळात वामपंथी आत्माच मानतात की नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे भारताचा आत्मा कोणता, याचा त्यांनी विचारही केला नसल्याचीच शक्यता आहे. परंतु, भारतातील राष्ट्रीय विचारवंतांनी मात्र याचा सखोल विचार केलेला दिसून येतो. आपल्या लक्षात येईल की, आध्यात्मिकता हा भारताचा आत्मा आहे. त्यामुळे ही आध्यात्मिकताच भारताचा जीवनाधारही बनली आहे. हिंदूत्वाचे थोर भाष्यकार स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात- पूर्व आणि पश्चिमेकडील देशांत प्रवास करून मी थोडेफार जग पाहिले आहे. मला असे दिसले की, प्रत्येक जातीचा एकेक विशिष्ट आदर्श असून तोच तिचा मुख्य आधार आहे- तिचा कणा आहे. राजकारण हा काही जातींचा जीवनाधार आहे; काहींचा जीवनाधार सामाजिक उन्नती हा आहे; काहींचा बौद्धिक उन्नती, तर काहींचा आणखी काही जीवनाधार आहे. पण, या आपल्या मातृभूमीचा धर्म हाच एकमेव जीवनाधार आहे आणि धर्माच्या पायावरच येथील जीवनाची सर्व इमारत उभारलेली आहे. यात स्वामीजींना धर्म म्हणजे उपासना हा अर्थ निश्चितच अभिप्रेत नाही. धर्म म्हणजे आध्यात्मिकता, असेच त्यांना म्हणायचे आहे. या आत्म्यावर विसंबून आम्हाला भारताची प्रगती करायची आहे. एकदा का हा जीवनाधार आमच्या मनात निश्चित झाला, त्या बाबतीत नि:संदिग्धता असली, की मग पुढे जाण्यासाठीचे मार्गदेखील डोळ्यांसमोर स्पष्ट होऊ लागतात.
 
 
केवळ भौतिक वस्तूंबाबतच स्वावलंबी व्हायचे ध्येय असते, तर पंतप्रधानांनी आत्मनिर्भर हा शब्द वापरलाच नसता, असे वाटते. त्यांना अधिक सूक्ष्म, अधिक सखोल अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. पंतप्रधान जेव्हा म्हणतात की, सध्या जगावर आलेल्या महासंकटाच्या काळात भारताला जगाला दिशा द्यायची आहे, तेव्हा तर आत्मनिर्भर भारताची संकल्पना अधिकच व्यापक होऊन जाते. जर जगाला दिशा द्यायची असेल, तर आम्हालाही केवळ भौतिक वस्तूंवर न थांबता त्याच्याही पलीकडे जायला हवे. त्यामुळे भारताला केवळ भौतिक वस्तूंबाबत स्वावलंबी व त्यांचे निर्यातदार बनून थांबता येणार नाही. त्याला भारतीय संकल्पनांचीही निर्यात करावी लागणार आहे. तरच तो जगाला दिशा देऊ शकतो. आधुनिक भाषेत या संकल्पनांना ‘सॉफ्ट पॉवर’ अशी संज्ञा रूढ आहे. आमच्या अतिप्राचीन सभ्यतेमुळे आमच्याकडे ही ‘सॉफ्ट पॉवर’ जगात कुणाकडे नसेल इतकी आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आमच्या जीवन जगण्याच्या, राज्यप्रशासनाच्या, मनुष्यजन्माच्या सार्थकतेच्या सनातन संकल्पना म्हणजे आमची ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. तिचीदेखील आम्हाला निर्यात करावी लागणार आहे. मानवी सभ्यतेचा जो अतिप्राचीन व अक्षुण्ण प्रवाह आमच्या समाजात सतत प्रवाहित आहे, त्यातील उत्तमोत्तम गोष्टी आम्ही जगाला देऊ शकतो. कोरोनाच्या महासंकटामुळे ही एक संधी भारताला मिळाली आहे.
 
 
आमच्याकडे राज्य आणि समाज यांचे संबंध कसे असले पाहिजे, याचे स्पष्ट विवेचन आहे. रवींद्रनाथ ठाकुरांनी आपल्या ‘स्वदेशी समाज’ या विचारप्रवर्तक निबंधात म्हटले आहे की, कल्याणकारी राज्य (वेलफेअर स्टेट) ही भारतीय परंपरा नाही. परंतु, अर्वाचीन जगाने मात्र ही संकल्पना स्वीकारलेली दिसते. प्रत्येक शासन कल्याणकारी राज्याची संकल्पना समाजासमोर ठेवत असते. समाजाचे कल्याण करण्याची जबाबदारी राज्यावर म्हणजेच सरकारवर आहे आणि ती त्याने पूर्ण सामर्थ्याने पार पाडली पाहिजे, असेच सांगितले जाते आणि त्या दिशेने प्रत्येक सरकार धडपडत असते. परंतु, आज कोरोनाच्या महामारीत या कल्याणकारी संकल्पनेच्या मर्यादा उघड्या झाल्या आहेत. कल्याणकारी राज्यामुळे समाज राज्यावर विसंबून राहिलेला आणि या महामारीमुळे राज्य हतबल झालेले आपण बघत आहोत. भारतीय परंपरा सांगते की, समाजाने राज्यावर कमीतकमी अवलंबून असले पाहिजे. आज भारताने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली असली, तरी, बहुतांशाने आपला समाज या भारतीय परंपरेला धरून राहिल्याने तो राज्यावर तितका अवलंबून नव्हता. त्यामुळेच या कसोटीच्या काळात लोकांवरील संकट दूर करण्यासाठी हा समाज राज्याच्या बरोबरीने मैदानात उतरला आहे. कशाचीही अपेक्षा न ठेवता, एका आत्मीय भावनेने या समाजाने संकटातील लोकांना मदत केली आहे. समाजानेच समाजाचे बहुतांश प्रश्न सोडविले, तर त्यात भ्रष्टाचाराचीही शक्यता राहात नाही. त्यामुळे समाजानेच समाजाची काळजी घ्यायची, चिंता करायची, ही संकल्पना भारताने जगाला दिली पाहिजे. भारताकडे ‘सेवा’ ही आणखी एक उदात्त संकल्पना आहे. दुसर्‍याला करावयाची मदत ही ‘चॅरिटी’ नसून ‘सेवा’ असली पाहिजे, हेही भारताने जगाला सांगितले पाहिजे. ‘सेवा’मध्ये मोबदल्याची अपेक्षा नसते. उलट, सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून कृतज्ञतेची भावना असते. अशा अनेक संकल्पना जगाला देण्यासाठी भारताकडे आहेत.
 
 
थोडक्यात, भारताने स्वत:जवळील ‘सॉफ्ट पॉवर’ ओळखून त्याचीही ‘निर्यात’ करणे सुरू केले पाहिजे. जगाला आज त्याची कधी नव्हे एवढी गरज आहे. सर्व प्रकारचे मॉडेल्स, संकल्पना वापरून जग थकले आहे. आता भारतच त्याच्या आशेचे केंद्र आहे. परंतु, ही सॉफ्ट पॉवरची निर्यात करण्यासाठी भारताने स्वावलंबी असले पाहिजे. लहानसहान गोष्टींसाठी दुसर्‍या देशांवर अवलंबून असलेल्या देशाचे जगात कुणी ऐकणार नाही. आणि म्हणून भारताने भौतिक वस्तूंबाबतही स्वावलंबी असले पाहिजे. पण, हे स्वावलंबन आमच्या ‘सॉफ्ट पॉवर’च्या निर्यातीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून असेल. भौतिक गरजांबाबत स्वावलंबी भारत आपली ‘सॉफ्ट पॉवर’ निर्यात करण्यास सक्षम होणे म्हणजेच भारताने आत्मनिर्भर होणे आहे. पंतप्रधानांना हेच अभिप्रेत असावे काय?