विटामध्ये फर्निचर शोरूमला भीषण आग

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
-दोन ते अडीच कोटींचे नुकसान
 
 
vita_1  H x W:
 
विटा (सांगली) : विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या भव्य श्वेता स्टील फर्निचर शोरूम दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरूममधील किमती साहित्य जळून खाक असून सुमारे दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विटा येथे घडली.
 
विटा येथील सुप्रसिद्ध उद्योजक कुमार पवार यांचे कराड रस्त्यालगत श्‍वेता स्टील फर्निचर नावाचे भव्य शोरूम आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी या शोरूमचे नूतनीकरण करून घेतले होते. विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरूमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरूमच्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता.
 
 
शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास पहिल्यांदा फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केले. मध्यरात्री वारा असल्याने ही आग बाजूलाच असलेल्या फर्निचर शोरूममध्ये गेली. त्यावेळी या भीषण आगीने संपूर्ण शोरूमला वेढा टाकला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर सांगली महानगरपालिका, विटा, तासगाव, आष्टा नगरपालिका, सोनहीरा, क्रांती साखर कारखाना यासह सुमारे ८ ते १० अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
 
 
आग इतकी भीषण होती की, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला समारे ६ ते ७ तासाचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर आग काही अंशी आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत शोरूममधील सोफासेट, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड, लोखंडी व लाकडी कपाट यासह अन्य किमती साहित्य व नूतनीकरण केलेले भव्य शोरूम जळून खाक झाले. त्याच्या बाजूला भांडी दुकान आहे. हे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.