संबंधित डॉक्टरांचे निलंबन मागे घ्या ः पालकमंत्र्यांना निवेदन

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

doctor_1  H x W 
 
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (कोविड-१९ हॉस्पिटल) स्वच्छतागृहात मृत वृद्ध महिला आढळणे ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्या दिवशी कार्यरत असलेल्या डॉक्टरांना याबाबत दोषी ठरविणे योग्य नाही. याबाबत विनाकारण अधिष्ठाता डॉ.भास्कर खैंरे, प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी, डॉ.कल्पना धनकवार यांना गोवण्यात आले आहे. संबंधित सर्व डॉक्टरांवर झालेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात सर्व डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी निवेदन दिले. तसेच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्‍यांनाही कारवाई मागे घेण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
 
 
सर्व डॉक्टर्स प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असून चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार घडला आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून कोविड १९ हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांसाठी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने क्वारंटाईनच्या सुट्या न घेता ड्युटी करीत आहेत. यास्थितीत डॉक्टरलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सध्या कोरोना बाधित व संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एक डॉक्टर एकावेळी सुमारे ८० ते २०० रुग्णांची काळजी घेत आहे. यास्थितीत रुग्ण बेपत्ता झाल्यावर ड्युटीवरील डॉक्टरांनी खबरदारी घेत पोलिसात तक्रार केली. तसेच उपस्थित परिचारिकांना रुग्ण शोधण्याचे आदेश दिले होते. आपले कर्तव्य बजावल्यानंतरही संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणे चुकीचे आहे. याबाबत प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी, भूलशास्त्र विभागात काम करणार्‍या निवासी डॉक्टर कल्पना धनकवार यांच्यावरील निलंबनाची कारवाई तसेच मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
निवेदनावर डॉ.धमेंद्र पाटील, डॉ.गणेश भारुवे, डॉ.मिलिंद चौधरी, डॉ.जितेंद्र कोळी, डॉ.अक्षय सरोदे, डॉ.स्वप्निल चौधरी, डॉ.सागर चौधरी, डॉ.निलेश दावेज, डॉ.सुयोग चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.