कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

Nandurbar Andolan_1 
नंदुरबार : पंधरा वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
 
 
सध्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचार्‍यांनी रुग्ण सेवेत झोकून दिले आहे. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांबद्दल शासनाची भुमिका उदासिन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाचा संकटात माघार न घेता एनएचएम कर्मचार्‍यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अखंडपणे रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाईझर व आवश्यक ती सुरक्षेतची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतू त्यासाठी या कर्मचार्‍यांना काळ्याफिती लावून आंदोलन करावे लागत आहे. या कर्मचार्‍यांचा सेवाकाळ १५ वर्षापासून अधिक झाला आहे. तरी देखील शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचार्‍यांना त्यांच्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु याच कोरोना योध्दांची सरकारकडून दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची भावना आहे. यामुळे ११ जूनपासुन बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी श्रीमती एल.जी.माळी (नंदुरबार), चंद्रकला पावरा (तळोदा), सविता गावित (नवापुर), शकुंतला ब्राम्हणे (धडगांव), पुष्पा बागुल (शहादा), सुनंदा वळवी (अक्कलकुवा), आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते उपस्थित होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवदेन देण्यात आले.