ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर अधिक भर द्या : पालकमंत्री डॉ.पाडवी

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

Dr. K.C.Padvi_1 &nbs 
 
 
नंदुरबार : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा. विशेषतः वन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. के. सी. पाडवी यांनी दिले.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.
 
 
कोरोना संसर्ग प्रतिबंधात प्रशासनाची उत्तम कामगिरी
जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना योग्यप्रकारे राबविल्या आहेत. परराज्यातील मजुरांना पाठविण्याबाबत जिल्ह्याच्या कामगिरीचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना नागरिकांनी गर्दी टाळण्याची गरज आहे. तसे होत नसल्यास नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी. बाहेरून येणार्‍या नागरिकांच्या आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी प्रयोगशाळेबाबत पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
 
 
जिल्ह्यातील अधिकाधीक शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करावे. शेतकर्‍यांना त्यासाठी आवश्यक प्रक्रीयेची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात यावी. बँकांनी यासाठी विशेष प्रयत्न करावे. दुर्गम भागात बँक शाखा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
 
 
श्री.पाटील म्हणाले, आदिवासी विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात दोन पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. त्यात १०० गावांचा समावेश आहे. यासाठी आयआयटी मुंबई आणि एमआरसॅकचे सहकार्य घेण्यात येईल. ज्या भागात रोजगारासाठी आदिवासी नागरिकांचे स्थलांतर होते अशा गावांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सादरीकरणाद्वारे विविध विषयांची माहिती दिली. जिल्ह्यातून परराज्यातील २६ हजार १०९ मजूरांना तर राज्यात इतर भागातील १६७५ नागरिकांना बसेसद्वारे सोडण्यात आले. ८६ हजार नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केले आहे.