लॉकडाऊन: ४९४ कर्करोग शस्त्रक्रिया

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

Cancer Surgery_Tata Hospi 
 
 
मुंबई : कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश रुग्णालय बंद होते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याचा मोठा फटका जगभरातील कर्करोगग्रस्तांना बसत असताना मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे आणि त्यांच्या टीमने तब्बल ४९४ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टाटा हॉस्पिटलच्या या कार्याची दखल जगातील आघाडीचे सर्जिकल जर्नल असलेल्या ’ऍन्नल्स ऑफ सर्जरी’ या अमेरिकेतील जर्नल्सने घेतली आहे.
 
 
लॉकडाऊनच्या काळामध्ये नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अनेक रुग्णाची मोठी गैरसोय झाली. कर्करोग रुग्णांच्या शस्त्रक्रियाही रद्द करण्याबरोबरच पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे याचा मोठा फटका रुग्णांना बसत होता. कोरोना रुग्णांना वाचवण्याच्या नादामध्ये ज्या रुग्णाला खरेच उपचाराची गरज आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होऊन यासाठी टाटा रुग्णालयाचे उप संचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी निवडक व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची तारीख दिली होती, यातील शस्त्रक्रिया अत्यावश्यक असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ३० एप्रिलपर्यंत पाच आठवड्यामध्ये तब्बल ४९४ मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. पाच आठवड्यामध्ये टाटा रुग्णालयमध्ये हजार शस्त्रक्रिया होतात. यातील ८५ टक्के शस्त्रक्रिया या अति महत्त्वाच्या प्रकारातील होत्या. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी ६४ टक्के शस्त्रक्रिया या मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींच्या करण्यात आल्या. यामध्ये डॉ. श्रीखंडे यांना त्यांच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम आणि अन्य कर्मचार्‍यांची उत्तम साथ लाभली. शस्त्रक्रिया केल्यानंतर २६ रुग्णांना कोरोना असल्याची शंका निर्माण झाल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असता सहा जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांची संपूर्ण काळजी हॉस्पिटलकडून घेण्यात आली, अशी माहिती डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली.
 
 
टाटा हॉस्पिटलने केलेल्या या कार्यामुळे ज्या देशांमध्ये मृत्यूदर कमी आहे अशा रशिया, सौदी अरेबिया, जपान, चीन यासारख्या देशांमध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात हे आम्ही आमच्या कृतीतून दाखवून दिले आहे. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, भारतासारखी स्थिती असलेल्या अन्य देशांमध्ये या अहवालाच्या आधारे कर्करोगग्रस्तांवर शस्त्रक्रिया करता येऊ शकतात अशी माहिती डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली.
टाटा हॉस्पिटलने केलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोविडदरम्यान कर्करोगाच्या महत्त्वाच्या निवडक शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले जाऊ शकते आणि सार्‍या जगासाठी हे एक दिशादर्शक ठरेल असे टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.