आश्रमशाळा अनुदान प्रश्न लवकरच मार्गी लावणार

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
 
 
आश्रमशाळाचालकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल
 
Ajit Pawar_1  H 
 
मुंबई : राज्यातील आश्रम शाळांच्या अनुदानाबाबत मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ पवार यांनी रत्नाकर मखरे यांच्याशी संवाद साधून आश्रम शाळा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
 
 
रत्नाकर मखरे यांनी ३० मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते, त्यानंतर पवार यांनी दहा दिवसानंतर निवेदन पाहिल्यानंतर त्यांनी ९ जून रोजी रत्नाकर मखरे यांना फोन करून तक्रार विचारली आणि आश्रम शाळांना लवकरच अनुदान देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
 
 
मखरे यांच्या आश्रमशाळेत व वसतिगृहामध्ये इयत्ता १ ते १२ वी पर्यंतची मुले आणि मुली एकूण ३६८ निवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी आहेत. त्यांनी स्वतःच्या मालकीची एकूण साडेसात एकर जमीन संस्थेला वापरासाठी दिली आहे. गेल्यावर्षी रेशनिंगवरचा गहू, तांदूळ फडणवीस सरकाने बंद केल्यामुळे संस्थाचालकांवरती कर्जाचा बोजा वाढला होता.त्यामुळे देणेकर्‍यांनी पैशासाठी तगादा लावला होता. राज्य शासनाने ९०० रुपयाची दरमहा दरडोईची परिपोषणाची अनुदान वाढवून ते दरमहा दरडोई १५०० रुपये केले. मात्र अद्यापर्यंत गेल्यावर्षीचे दरमहा दरडोई १५०० रुपयांप्रमाणे अंतरिम अनुदान व अंदाजित अनुदान आश्रमशाळा व वसतिगृहांना मिळाले नाही.
 
 
अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने व समाजकल्याणच्या सामाजिक विभागाने अनुदान का वितरीत केले नाही? याच्यामागे करोनाचे कारण असावे, असे मला वाटत नाही. जर करोनाचेच कारण असेल तर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील व सामाजिक न्याय विभागाच्या समाजकल्याण खात्याच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली पगारासह त्यांचीही बिले थांबायला पाहिजेत, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशीही मागणी मखरे यांनी केली होती.