पत्रकारितेतील ‘कर्मयोद्धा’!

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
vamnrao_1  H x
 
वामनराव तेलंग... विदर्भाच्याच नव्हे, तर सार्‍या महाराष्ट्रातील साहित्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक गणमान्य व्यक्तिमत्त्व. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह आणि विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष... अशा कितीतरी बिरुदावल्या त्यांना लावता येतील. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एका निःस्पृह व्यक्तिमत्त्वाला, निरपेक्ष वृत्तीने काम करणार्‍या सर्जनशील संपादकाला, परखड विवेचकाला आणि साहित्यक्षेत्रातील जुन्याजाणत्या व्यासंगी तपस्वीला आपण मुकलो आहोत.
 
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे वामनरावांचे मूळ गाव. प्रारंभीचे त्यांचे शिक्षण अमरावती येथेच झाले. त्यांनी नंतर अभियांत्रिकीची पदविका घेतली. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. पण, हा तांत्रिक विषय त्यांना फारसा भावला नाही आणि त्यांनी पत्रकारितेत मुशाफिरी करण्याचा निर्णय घेतला. 1968 मध्ये, मुख्य संपादक मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या प्रयत्नांमुळे ते तरुण भारतमध्ये रुजू झाले. उपसंपादक म्हणून सुरू झालेली त्यांची कारकीर्द फुलू लागली. सहायक संपादक, कार्यकारी संपादक या पदोन्नतीच्या मार्गाने पुढे ते तरुण भारतच्या मुख्य संपादकांच्या मांदियाळीत जाऊन बसले. तरुण भारतमध्ये त्यांनी तब्बल 31 वर्षे काम करीत आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला. मामासाहेब घुमरे, बाबूराव वैद्य, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक या सार्‍या माजी मुख्य संपादकांबरोबर काम करण्याचा त्यांना योग आला. त्यांच्याचसोबत वामनरावांची वैचारिक जडणडघडण झाली. आज त्यांच्या मृत्यूमुळे तरुण भारतच्या मुख्य संपादकांच्या पुष्पाची एक पाकळीही गळून पडली आहे.
 
 
वामनराव मितभाषी, मृदुभाषी म्हणून ओळखले जात. पण, तेवढेच ते स्पष्टवक्तेसुद्धा होते. कुणालाही न भिता आपली मते स्पष्टपणे मांडण्याची त्यांची हातोटी होती. आत एक आणि बाहेर एक असा त्यांचा स्वभाव नव्हता. कुणालाही काही सूचना करताना त्या स्पष्टपणे आणि त्याला न दुखावता करण्याचे कौशल्यही त्यांनी मिळविले होते. प्रथमदर्शनी अबोल वाटणारे वामनराव मित्रांमध्ये मात्र प्रचंड रमत असत. त्या वेळी त्यांचा अस्सल वैदर्भीय अघळपघळ स्वभाव उपस्थितांमध्ये रंगत आणत असे. त्यांच्याजवळचे संदर्भदेखील अनेक अभ्यासकांना उपयोगी पडत. पत्रकारितेचे प्रारंभिक धडे त्यांनी अमरावती या त्यांच्या जन्मभूमीत घेतले.
 
 
तरुण भारतात त्यांनी ‘विविध विषय विभाग’ या रविवार पुरवणीचे अनेक वर्षे संपादन केले. संस्थापक संपादक भाऊसाहेब माडखोलकर यांच्या साहित्यिक आणि वाङ्‌मयीन परंपरेचे पालन करीत त्यांनी या पुरवणीची अभिरुची कायम राखली. त्यात वेळोवेळी काळानुरूप बदल केले आणि तिची लोकप्रियता उच्चांकी नेली. अनेक लेखकांना त्यांनी तरुण भारतातून लिहिते केले, त्यांना लेखनाची शैली शिकविली, लेखनकौशल्यातील बारकावे समजावून सांगितले, वृत्तपत्रीय लिखाणाचे महत्त्व पटवून दिले आणि केवळ उपदेशच केला नाही, तर त्यांनी आपल्या संपादकीय लेखणीतून हे सारे आपल्या लिखाणातही उतरविले. त्या काळी प्रभाकर शिरास आणि वामनराव यांच्यातील मैत्रीची सर्वत्र चर्चा असे. हे दोघेही ‘वामन प्रभू’ या नावाने लिखाण करीत असत, पण त्यांच्या कथा जास्त गाजल्या. कथा कुणीही लिहिली तरी त्या खाली त्यावर नाव वामन प्रभू असेच प्रसिद्ध होई. त्यांच्या या नावाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पुढे याच वामन प्रभूपैकी प्रभू म्हणजे शिरास त्यांचे व्याही झाले. वामनरावांनी अनेक कवीदेखील घडविले. या कवींना कथा-कवितेची बीजे पुरविली आणि त्यांच्या लिखाणातील त्रुटीदेखील विनातक्रार दुरुस्त केल्या. पण, लेखकांबद्दल त्यांचे स्वतःचे एक ठाम मत होते. कुठलाही संपादक लेखकाला घडवत नसतो, असे ते मानीत. परंतु, लेखकाला लिहिते करणे आणि त्याला त्याच्या लेखनाबाबत अनुकूल अथवा प्रतिकूल प्रतिक्रिया कळवणे, हे संपादकाचे काम असते, असेही ते मानीत. यातूनच त्यांनी अनेकांना पत्रे लिहिली. काहींची नाराजीही ओढवून घेतली. लेखकांना त्यांनी पाठविलेल्या पत्रांच्या संकलनावर एखादे पुस्तकही निघू शकेल, एवढी ही पत्रसंख्या असावी. संपादकीय संस्कार ही काय चीज असते, हे वामनरावांबरोबर काम केलेल्या व्यक्तींना निश्चितच माहीत असेल. न आवडलेला लेख संपादक अगदी टराटरा फाडून कचर्‍याच्या टोपलीत फेकतात, हे आपल्यापैकी अनेकांनी नुसते ऐकलेच असेल, पण याचा अनुभव त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना निश्चितच आला असेल.
 
 
कुठल्याही लेखातील फाफटपसारा कसा दूर सारायचा, त्या लेखाचा इण्ट्रो किती सटिक करायचा, वृत्तपत्रीय धोरणानुसार तो किती टिपेचा आणि टोकाचा असावा, याची एक विशिष्ट शैली असते. वामनरावांनी ही शैली प्रयत्नपूर्वक आत्मसात केली होती आणि कंटाळवाणे वाटणारे हे काम त्यांनी शांतचित्ताने आणि आनंदाने आपल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून अंगीकारून टाकले होते. सुंदर हस्ताक्षराचीही त्यांना देण होती. वर्तमानपत्रातील चुकांच्या संदर्भातील त्यांच्या सूचनांमुळे नव्याने काम करणार्‍या पत्रकारांना त्यांची चूकही उमगत असे आणि पुढे कोणती पावले उचलायची, याचे मार्गदर्शनही मिळत असे. त्या काळी तरुण भारतात क्रीडवर काम करणार्‍यांना खास वामनरावांच्या दिमतीला रात्रपाळीत कामासाठी दिले जायचे. भाषांतराची त्यांची हातोटी होती. त्यांची ती शैली अनेकांनी आपल्या कार्यशैलीत उतरविली आणि यशस्वितेची उड्डाणे घेतली. अभियांत्रिकीच्या शिक्षणामुळे त्यांना वृत्तपत्राची रचना आणि मांडणीत विशेष रस होता. मुखपृष्ठाच्या आणि एकंदरीतच अंकाच्या रचनेतही त्यांचा सहभाग असायचा. यातूनच रविवारच्या पुरवणीत त्यांनी मांडणीसंदर्भातील अनेक प्रयोग यशस्वीपणे साकारले आणि वाचकांकडून पसंतीही मिळविली. तरुण भारताची एक पिढी घडविण्याचे कामच या व्यासंगी, तपस्वी पत्रकाराने केले.
 
 
वामनराव साहित्यिक होते, पण कधी त्यांनी साहित्यिकाचा आव आणला नाही. व्यासपीठीय साहित्यिक म्हणून त्यांनी कधी मिरवूनही घेतले नाही. पण, त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि परखड प्रतिपादनामुळे अनेक कथालेखक आणि कवी त्यांना आपापल्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी बोलावण्याबाबत आग्रही असत. अनेक लेखक, कवी त्यांनीच घडविले असल्याने, प्रसंगी त्यांच्या वेळेनुसार प्रकाशनाचे कार्यक्रम मागे-पुढे ढकलले जात असत. समाजात सक्रिय राहूनसुद्धा त्यांच्यातील स्थितप्रज्ञ भाव वाखाणण्यासारखा होता. कुठल्याही प्रसंगाचा त्यांच्या मनावर फारसा परिणाम जाणवत नसे. एखाद्या गोष्टीचा आनंद आणि दुःख ते सारख्याच अंत:प्रेरणेने पेलवून घेत. ललित लेखक, परखड समीक्षक, कथालेखन, मितभाषी, मृदुभाषी, सर्व लोकांना सांभाळून घेणारे... असे कितीतरी त्यांच्या स्वभावाचे पैलू सांगता येतील.
 
 
व्यक्ती किती जगली यापेक्षा ती कशी जगली, याला महत्त्व असते. वामनरावही त्याला अपवाद नव्हते. अखेरच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते. त्यांनी संपादकीय आणि साहित्यक्षेत्राची अविरत सेवा केली आणि ही क्षेत्रे गाजविलीही. त्यांनी घडविलेले अनेक साहित्यिक आज आपापल्या क्षेत्रात मानाची पदे भूषवीत आहेत. विदर्भ साहित्य संघावर तर त्यांचे प्रचंड प्रेम होते. याच आपुलकीपोटी त्यांनी या संस्थेची निरंतर सेवा केली, तिच्या वाढीसाठी विदर्भ पालथा घातला. 16 मार्च हा वामनरावांचा जन्मदिन. यंदा त्यांच्या मुलींनी बाबांचा वाढदिवस त्यांच्या नकळत, झोकात साजरा करायचा आणि एक गौरवपुस्तिका काढून त्यांना सुखद धक्का द्यायचा असा निर्णय घेतला होता. त्या अंकाची तयारीही पूर्ण झाली होती. पण, कोरोनामुळे ते काम पुढे ढकलले गेले आणि आता तर या कर्मयोद्ध्याने आपल्या सगळ्यांच्या नकळत या जगातूनच ‘एक्झिट’ घेतली. त्यांच्या निधनाचा आघात सहन करण्याची ताकद परमेश्वराने, त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना द्यावी, ही ईशचरणी प्रार्थना!