आत्मनिर्भर होण्याची वेळ आली

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
जगाचा विश्वासार्ह भागीदार होण्याची भारतात क्षमता : पंतप्रधान मोदी 
 
 
 
modi2_1  H x W:
 
नवी दिल्ली,
जगाचा विश्वासू भागीदार होण्याची आणि जगाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता भारतात असल्याचे कोरोना संकटाच्या काळात स्पष्ट झाले आहे. आता आम्ही आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असून, ती वेळ देखील आली आहे. दुसर्‍या देशांवर अवलंबून राहणे आपल्याला कमी करावे लागणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केले. पंतप्रधान मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) 95 व्या वार्षिक सत्राला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
आज संपूर्ण जगावर कोरोनाचे भीषण संकट आहे आणि या संकटात भारताने महासत्ता अमेरिकेसह अनेक देशांना मदतीचा हात दिला. यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. कुणीतरी विश्वासार्ह भागीदार असावा, या शोधात आज संपूर्ण जग आहे आणि ती क्षमता आणि सामर्थ्य भारतात आहे. कोरोना हे एक संकट असले, तरी भारतासाठी ती एक संधी देखील आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
भारतीय उद्योगांनी जगात आपल्या देशाविषयी जो विश्वास वाढला आहे, त्याचा फायदा नजीकच्या भविष्यात भारताला नक्कीच होणार आहे. सलग 95 वर्षे देेशाची निरंतर सेवा करणे कोणत्याही संस्थेसाठी फार मोठी गोष्ट असते. आयसीसीने पूर्व भारत आणि ईशान्य भागाच्या विकासासाठी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे, असे मोदी म्हणाले.
 
 
आत्मनिर्भर, विश्वसनीय भारताची निर्मिती
समोर आलेले प्रत्येक संकट आपली परीक्षा घेत असते. अनेकदा कठीण परिस्थिती आणि कठीण परीक्षा एकत्र येत असतात. अशा काळात आपली कृती आणि व्यवहार आपल्याच देशाच्या उज्ज्वल भविष्याची हमी जगाला देत असते. आत्मनिर्भर आणि विश्वसनीय भारताची निर्मिती आपल्याला करायची आहे. आत्मनिर्भरतेचा हा भाव प्रत्येक भारतीयाच्या मनात कित्येक वर्षांपासून आहे. आता आत्मनिर्भर भारत साकारण्याची वेळ आलेली आहे. माझ्या सरकारच्या मागील सहा वर्षांच्या काळात जी काही धोरणे राबविण्यात आली, त्यात भारताला आत्मनिर्भर करणे हेच मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोठ्या बदलांच्या दिशेने पुढाकार घेण्यात आला असून, आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
आता आयात नाही, निर्यात करू
आता स्थानिक उत्पादनांसाठी भारतातच प्रोत्साहन दिले जात आहे. आज आपण ज्या गोष्टी आयात करीत आहोत, त्या भविष्यात निर्यात करू शकू, या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आहे. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत अलिकडील काळात जे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे वर्षानुवर्षे गुलामीत असलेली कृषी अर्थव्यवस्था मुक्त झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.