महाराष्ट्र, गोव्यात मान्सून दाखल

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
 
news3_1  H x W:
 
पुणे : आज येईल, उद्या येईल, असे म्हणत म्हणत अखेर मान्सून गुरुवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र आणि गोव्यात दाखल झाला आहे. िंसधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्येही मान्सून सक्रिय झाला असून, सध्याची त्याची प्रगती पाहू जाता, आगामी 48 तासांत महाराष्ट्राचा बहुतांश भाग मान्सूनच्या कवेत असेल, अशी माहिती पुणे आणि गोव्यातील वेधशाळेच्या अधिकार्‍यांनी दिली.
मान्सून अतिशय वेगाने वाटचाल करीत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही त्याने बरीच प्रगती केली आहे. कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल मारली असून, संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यही व्यापले आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. हा पट्टा आता उग्र रूप धारण करीत आहे. मान्सूनने गोवा आणि कोकणची किनारपट्टी पूर्णपणे व्यापली आहे. सध्या त्याच्यासाठी अतिशय पोषक स्थिती आहे. आज सायंकाळी उशिरापर्यंत तो पुण्यात दाखल होईल आणि उद्या शुक्रवारी मुंबईत पोहोचेल. त्यानंतर त्याचा मराठवाडा आणि विदर्भ असा प्रवास सुरू होईल, असे अधिकार्‍यांचे मत आहे.
 
 
गोवा आणि कोकणच्या बहुतांश भागांमध्ये आज अवघ्या काही तासांमध्येच मान्सून दाखल झाला. या भागांत पावसालाही सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी सरी पडल्या. याशिवाय, मुंबईतही आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण असून, काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.
 
 
विदर्भात यायला आणखी दोन दिवस
मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्राकार स्थिती निर्माण होत असून, त्याच्या प्रभावाने मान्सूनच्या वार्‍यांना आणखी गती मिळेल आणि मराठवाडा व विदर्भात मान्सूनचा प्रवास आणखीच सुकर होईल, असे अधिकार्‍याचे मत आहे.