क्षुल्लक कारणावरुन हॉटेल मालकाचा खून

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
दोघं संशयित पोलीस स्थानकात हजर 
 
 
police_1  H x W
 
जळगाव, १२ जून
शहरातील नेरी स्मशानभूमीजवळील एका हॉटेलमध्ये दारू पितांना झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (५०, रा. आसोदा) यांचा दोघांनी निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
 
 
दरम्यान, शुक्रवारी दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास नेरी स्मशानभूमी जवळ असलेल्या आसोदा मटन हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. थोड्याच वेळात वाद वाढून त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी दोन्ही तरुणांनी चिरमाडे यांच्यावर हल्ला चढविला. त्यातील एका हल्लेखोराने बिअरची बाटली थेट चिरमाडे यांच्या मानेत खुपसली. त्यानंतर जखमी अवस्थेत चिरमाडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. मयत चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पाहिले असून त्यातील एकाची ओळखदेखील पटली आहे. दरम्यान, आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका चिरमाडे यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
दोघे संशयित पोलीस स्थानकात हजर
दरम्यान, या खून प्रकरणातील दोघे संशयित प्रशांत कोळी (रा.जैनाबाद) नामक तरुण अन्य एकासह शनिपेठ पोलीस स्थानकात हजर झाला आहे. पोलिसांनी शेजारच्या बिअरशॉपी दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ठसे तज्ञ देखील घटनास्थळी पोहचले होते. या बिअर शॉपी मालकासोबत हल्लेखोरांनी बिअर फुकट द्यावी म्हणून वाद घातला होता, असेही तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दोघं संशयित आरोपी यांच्यावर सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पती व पत्नीस मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.