पीक विमा योजनेच्या नावानेअकुलखेडेच्या शेतकर्‍यांची फसवणूक

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
महा ई सेवा केंद्राच्या संचालका विरुद्ध पोलिसात गुन्हा, आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी
 
 
चोपडा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावाखाली पिकांचा बोगस विमा काढून देऊन शेतकर्‍यांची
फसवणूक करणार्‍या चुंचाळे (ता.चोपडा) येथील महा ई सेवा केंद्राचे संचालक नितीन रोहिदास कुमावत याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.दरम्यान संबधित आरोपीस गुरुवारी दुपारी चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
चुंचाळे येथील महा ई सेवा केंद्राचे संचालक नितीन रोहिदास कुमावत यांने फोन करून अकुलखेडे येथील शेतकरी प्रभाकर दामू महाजन यांना शेतातील रब्बी पिकांचा विमा उतरविण्यासाठी बोलावून ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांचेकडून पैसे घेऊन चहार्डी शिवारातील शेतातील रब्बी पिकाचा विमा उतरवून पावती दिली. विमाधारक शेतकरी प्रभाकर महाजन यांचे रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी भरपाईसाठी संबंधित विमा कंपनीकडे अर्ज केला. परंतु कंपनीने सदरची पावती बनावट असून ,त्या पावतीवर कंपनीचा बारकोड नाही म्हणून पावती ओरिजनल नसून बनावट असल्याचे सांगितले.
 
 
 
आपली फसवणूक झाल्याचे शेतकर्‍याच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीस गाठून चुंचाळे येथील महा ई सेवा केंद्राच्या संचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. अकुलखेडे येथील शेतकरी प्रभाकर दामू महाजन यांच्या फिर्यादीवरून महा ई सेवा चालक नितीन रोहिदास कुमावत (३०) रा . चुंचाळे (ता.चोपडा) याचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा २ रोजी दाखल करण्यात आला असून आरोपी नितीन कुमावत यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चुंचाळे येथील महा ई सेवा केंद्राचे लॅपटॉप, प्रिंटर व मोबाईल जप्त केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.जितेंद्र सोनवणे करीत आहेत.