केरळमधील मंदिराचे रक्षण करते शाकाहारी मगर - बबियाला !

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 

ANTPURA TEMPEL_1 &nb 
 
असे म्हणतात की, भारत हा अशक्यप्राय आणि दुर्मीळ घटनांचा देश आहे. प्राचीन उपखंडात अनेक विचित्र आणि रहस्यमय घटना, प्रथा पाहायला किंवा ऐकायला मिळतात. दरम्यान, केरळच्या सुंदर बॅकवॉटर प्रदेशातून फिरताना जेव्हा याबद्दल माहिती मिळाली तेव्हा मन भरून आले . कारण आपण जगातील सर्वात क्रूर, मांसाहार करणारा प्राणी शाकाहारी आहारावर टिकून राहण्याची कल्पना तरी करू शकतो का ? विशेष म्हणजे, ते या मंदिराचे संरक्षणही करतात
 
 
मांसाहार करणार्‍याला शाकाहारी आहार ग्रहण करावयास लावणे कठीण असते. मग केवळ मांसाहार करणार्‍या प्राण्याला शाकाहारी अन्नाचा स्वीकार करायला लावणे किती अवघड असेल? मात्र, असे घडते हे सत्य आहे.ते घडते केरळमधील एका पवित्र स्थानावरील तलावावर.तेथील रहिवासी शाकाहारी बबिया मगर म्हणजे एक चमत्कारच.
 
 
सुरुवातीला, बबिया केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील नावाच्या गावात असलेल्या अनंतपुरा तलावाच्या मंदिराची पालक होती. स्थानिक पौराणिक कथेनुसार, बबिया फक्त मंदिरातील प्रसादच खाते - जो दररोज दुपारच्यावेळी देवतांची उपासना केल्यानंतर दिला जातो. शाकाहारी प्रसादामध्ये शिजवलेला तांदूळ आणि गूळ यांचा समावेश असतो आणि भाविक अत्यंत सहजपणे व कोणतीही भीती न बाळगता स्वत:च्या हाताने त्या मगरीला खायला घालतात.
 
 
भगवान श्रीकृष्णशी निगडित कथा
 
 

ANTPURA MANDIR PIC_1  
 
यासंदर्भात भगवान श्रीकृष्णाशी निगडित एक अदभूत कथा असून भक्तमंडळी त्यानुसार बबियाच्या अस्तित्वाबाबत यावर प्रकाश टाकतात. त्यानुसार, जेव्हा श्री. विल्वमंगलथु स्वामी आपल्या श्रीदेव विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी सखोल चिंतनात गुंतले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान मुलाच्या रूपात दिसू लागले आणि आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या खोड्या करू लागले. त्या चिमुकल्या बाळाच्या खोड्यांनी विल्वमंगलथु स्वामीनी त्याला बाजूला केले. पण त्यांना आपली चूक लक्षात येईपर्यंत तो मुलगा-कृष्ण जवळच असलेल्या गुहेत लुप्त झाला. कृष्ण ज्या अवस्थेत गायब झाले होते तेच मंदिराच्या गाभ्यात (आत)आताही कुठेतरी स्थित आहे आणि हीच मगर बबिया या रहस्यमय प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी तेथे पालक म्हणून स्थित आहे.
आणखी एक आख्यायिका अशी आहे की, सुमारे 70 वर्षांपूर्वी एका ब्रिटिश सैनिकाने अनंथपुरा तलाव मंदिरात पहारावरील मगर मारली होती. मात्र , आश्चर्याची गोष्ट अशी की, नंतर थोड्याच वेळात त्या शिपायाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. स्थानिक लोकांच्या मते, त्याला त्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना सर्प देवतेने शिक्षा दिली होती. थोड्याच वेळात, पूर्वीच्या पालकाची जागा घेण्याकरिता तलावामध्ये आणखी एक मगर दिसू लागली. तसेच प्रत्येकवेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यावर, त्याच्या जागी दुसरी मगर येते , हे त्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे !
 
 
अनंतपुरा येथील या लोकमंदिराची आणि शाकाहारावर जगणार्‍या व एका सरपटणार्‍या सेवकाची अशी ही विलक्षण कथा आहे. बर्‍याचदा, सत्य हे आपल्या कल्पनेपेक्षाही खूप वेगळे असते असे म्हणतात ते काही खोटे नाही.
 
पर्यावरण आणि सदाचाराचा विनाशक माणूसच !
 
 

ANTPURA MANDIR PIC_1  
 
निसर्ग आपले सदैव संतुलन सांभाळतो. पर्यावरणाचा संतुलन बिघडवण्याचे काम मनुष्यच करतात. पावसाळा वेळेवर होत नाही कारण, पर्यावरणाचा विनाश. माणूस हा खरे तर शाकाहारी आहे, पण तो मांसाहार करतो, प्राण्यांची हत्या करतो, झाडांची कत्तल करतो त्यामुळेच निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. मगरीसारखा मांसाहारी प्राणीही शाकाहारी असू शकतो का? माझ्या मते, असू शकतो. एखाद्या शाकाहारी कुटुंबात जर कोणी कुत्रा पाळला असेल तर तो कुत्रा शाकाहारीच असतो. कारण त्याचा आहार-विहार. त्याला घरात जसे वातावरण मिळेल तसाच तो घडेल. तो आपल्याकडे असेपर्यंत आपण दिलेल्या सूचनांचे पालन करेल. खरे तर, कुत्रा हा मांसाहारी प्राणी पण त्याला मिळालेल्या वातावरणाने तो शाकाहारी होईल.तसेच या मगरीचेही असावे.तिचा ठराविक काळ संपेपर्यंत तिचे तेथे वास्तव्य राहत असावे आणि कालमर्यादा संपली की, तेथे त्या मंदिराच्या संरक्षणासाठी दुसरी मगर येत असावी. आपल्याकडे एखादी अपरिचित व्यक्ती आल्यास आपल्याकडील पाळीव कुत्रा जे करेल त्यातीलच हा प्रकार आहे. ह्याच भावनेने मगरीही मंदिराचे संरक्षणाचे कार्य करीत असणार.
 
 
दृष्टांत देतात शिकवण
 
 
त्या मगरीवर देवाची कृपा आहे असे क्षणभर आपण खरे मानले तरी पौराणिक काळापासून आपल्याकडे ज्या विविध दंतकथा सांगितल्या आणि ऐकल्या जातात त्यामागेही समाजप्रबोधनच असते. कारण त्या वास्तविक जीवनाशी निगडीत असतात. दंतकथेचा जन्मही तेव्हाच झाला असेल जेव्हा कुणी याचा दृष्टांत दिला असेल. एखादी गोष्ट अधिक प्रभावीपणे समाजमनावर ठसवायची असल्यास त्यासाठी काहीतरी उदाहरण म्हणून दृष्टांत दिला जातो. त्यापासून आपल्याला काहीना काही शिकवण मिळते. हे होऊ शकते, अशक्य काहीही नसते. त्यामुळे पौराणिक आणि दंतकथेची वेगळीच प्रचिती आणि महती आहे, मात्र त्यामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 
-रतनलाल सी. बाफना, शाकाहार-सदाचार अभियानाचे प्रणेते