बेभरवशाचे शेजारी

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |

modi_1  H x W:  
 
निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण मराठीत आहे. अशा निंदकांचा कधी आपल्याला त्रास होतो तर कधी त्यांच्यामुळे आपल्याला आपल्यातली शक्ती ओळखून स्वत:चेे सामर्थ्य वाढविण्याचे बळ प्राप्त होते. असाच काहीसा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला जागतिक पातळीवर बघायला मिळत आहे. पाकिस्तान आणि चीन ही दोन भारताची शेजारी राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांसोबत वर वर पाहता भारताचे संबंध चांगले असले तरी भारताला कमी कसे लेखता येईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अडचण कशी करता येईल, भारताच्या विधायक कार्यांमध्ये अडथळे कसे निर्माण करता येतील, भारतामध्ये अस्थिरता कशी माजविता येईल याचाच हे दोन्ही देश सतत विचार करीत असतात आणि तशा क्लृप्त्याही करीत असतात. असे असूनही भारत आज जागतिक पातळीवर खंबीरपणे केवळ उभाच आहे असे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिवसेंदिवस प्रगती करीत आहे आणि या दोन्ही राष्ट्रांचे मनसुबे उधळू लावण्यासाठी मजबूतही होत आहे.
कोरोना ही चीनने सार्‍या जगाला दिलेली देण आहे. या कोरोना नावाच्या विषाणूचा फटका भारताप्रमाणेच जगातील बहुतांश देशांना बसला आहे. या रोगापासून सुटका मिळावी म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपायामुळे असंख्य देशांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. कोणी म्हणतो की हा विषाणू मांस विक्रीच्या ठिकाणाहून आला, तर कोणी म्हणतो की चीनच्या प्रयोगशाळेतून आला. परंतु, नेमका कोठून आला याबाबत अजून तरी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी चीनमधून हा विषाणू सार्‍या जगात पसरला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज अमेरिकेसह जगातील बहुतांश देशांनी चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. चीनमधील उद्योगधंदे बंद करून अन्यत्र हलविण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या एकूणच पृष्ठभूमीवर तसेच भारताची अमेरिकेसोबतची वाढती जवळीक पाहता चीन थोडा बावचळल्यासारखा झाला आहे. या कोरोना विषाणूचा फायदा होऊन आपले विविधांगी सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असलेला चीन भारताला खिजविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मग भारताचा परंपरागत शत्रू पाकिस्तान आणि छुपा शत्रू नेपाळ यांची मदत घेतली जात आहे. सीमेवर आपल्या कारवाया वाढवून भारतावर दबाव आणण्याचा चीनचा प्रयत्न सुरू असून भारतही त्याला तेवढ्याच खंबीरपणे उत्तर देत आहे. दोन्ही देशांच्या सीमेवरील वाढती तणावाची स्थिती आणि आतून कोरोनाने पोखरलेली अर्थव्यवस्था यामुळे िंचतेत असलेले दोन्ही देश आता तणाव कमी करण्यासाठी एका टेबलावर बसून चर्चा करू लागले आहेत. चर्चेच्या दोन फेर्‍या आटोपल्या आहेत.
देशात बहुमताचे सरकार असले म्हणजे त्याचे कसे फायदे होतात, निर्णय कसे खंबीरपणे घेतले जाऊ शकतात, हे आपण अलिकडच्या काळात बघतोच आहोत. देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार आहे आणि या सरकारचे नेतृत्व धीरोदात्त व्यक्तिमत्त्व असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. भलेही त्यांच्या विदेश दौर्‍याला विरोधकांचा विरोध असो की त्यांच्या विरोधातील लोक त्यांच्यावर या मुद्यावरून टीका करीत असोत, त्यांच्या या विदेश दौर्‍यामुळे भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत झाली आहे, शिवाय अतिरेक्यांना पाठबळ देणार्‍या पाकिस्तानला एकाकी पाडण्यातही या सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. अशा या खंबीर आणि गंभीर नेतृत्वामुळेच आज चीनला नमते घ्यावे लागत आहे. पाकिस्तान व नेपाळची मदत घेऊन कुरापती काढत भारताला शह देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चीनला भारताने हॉंगकॉंग, म्यानमार, फिलिपाईन्स आणि इतरही देशांना मदत करून आपल्या बाजूने वळवून घेत काटशह दिला आहे.
चीनचा भारताप्रती जळफळाट होण्यामागे आणखी एक विषय कारणीभूत आहे तो म्हणजे भारतात चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या अवाहनाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे बहुतांश व्यवहार ठप्प पडले. आर्थिक घडी विस्कटली. रोजंदारीची कामे करून हातावर कमावून खाणार्‍यांचे हाल झाले. कोरोनाची भीती आणि बेरोजगारी यामुळे असंख्य मजूर व कामगारांनी आपापल्या गावांकडे पलायन केले. त्यामुळे गावांवरील आर्थिक बोझाही आता वाढणार आहे. या सार्‍या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भर होण्याचा मंत्र दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे विदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तशीच परिस्थिती आता उद्भवली आहे. शहरांप्रमाणेच गावांचीही अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर स्वावलंबी होऊन स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करणे आवश्यक आहे. चिनी वस्तूंनी आज मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठ व्यापली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणेच अलिकडेच पुण्यात रस्त्यांवर चादरी पसरवून त्यावर चिनी वस्तू टाकण्याचे आवाहन करण्यात आले, नागरिकांनी त्याला प्रतिसादही चांगला दिला आणि या चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे आंदोलन आपल्या देशात राबविले जाणार असले तरी त्यामुळे चीनचीही अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतावर दबाव वाढवून हे आंदोलन मागे घेण्यासाठीही चीन काय काय करेल, हे सांगता येत नाही. आज सर्वसामान्य वस्तूंप्रमाणेच भारतीय सणावारांच्या वस्तूही चीनने तयार करून भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. वस्तूंच्या कमी किमती आणि व्यापार्‍यांना मिळणारा मोठा नफा यामुळे या वस्तूंनी बाजारपेठेवरही चांगला कब्जा मिळविला आहे. हे सारे आपल्याला मोडून काढायचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपल्यामुळे मजबूत होणारी इतर देशांची मुख्यत्वे करून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची आहे. त्यांचे पाकिस्तानला असलेले समर्थन आणि केली जाणारी आर्थिक रसदही रोखायची आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. भारतीय सैन्यही त्याला प्रत्युत्तर देऊन गेल्या काही दिवसांपासून रोजच अतिरेक्यांचा खात्मा करीत आहे. स्वत:चे सामर्थ्य वाढविणे, आपल्या देशाला विकसित करणे यापेक्षा भारतासमोर अडचणी निर्माण करणे, हा जणू एक कलमी कार्यक्रम पाकिस्तानात, मग सरकारचे कोणाचेही असो, राबविला जात आहे. या शेजार्‍याला आधी अमेरिकेचे पाठबळ होते. आता मात्र अमेरिकेलाही पाकिस्तान काय चीज आहे, हे कळल्यामुळे त्यांनी रसद बंद केल्यामुळे हा देश चीनच्या दावणीला बांधला गेला आहे. चीन म्हणेल ती पूर्व दिशा, हेच त्यांचे धोरण आहे. पाकिस्तानप्रमाणेच कोणेएकेकाळी सख्खा शेजारी असलेला नेपाळही आता भारताच्या कुरापती काढत आहे. अर्थातच त्याला चीनचे पाठबळ आहे. त्यामुळे आता कोणत्या शेजार्‍यावर भरवसा ठेवावा आणि कोणत्या नाही, अशा मन:स्थितीत भारत आला असला तरी मोदींसारख्या खंबीर नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डावपेच आखून या समस्यांमधून, अडचणींमधून मार्ग काढता येईल, हे निश्चित आहे.
रस्त्यांप्रमाणेच समुद्रातही चीनने भारताच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचा त्रास भारतालाच नव्हे, तर ऑस्ट्रेलियालाही होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने उभा राहण्यासाठी तयार आहे. चीनचा स्वभाव लक्षात घेता भारताने सातत्याने दक्षिण चीन समुद्राशी संबंधित देशांसोबत आपले संबंध चांगले ठेवले आहेत. दुसरीकडे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही भारताने आपली उपस्थिती मजबूत केली आहे. कोरोनाचा सामना करताना भारताने औषधांच्याबाबत केलेल्या मदतीमुळे अमेरिकाही भारताच्या बाजूने झाला आहे. या सगळ्या पृष्ठभूमीवर चर्चा किंवा वाटाघाटी करताना भारताने या शेजारी राष्ट्रांचा इतिहास तपासून बघायला हवा. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात... हे लक्षात घेऊन या बेभरवशाच्या शेजार्‍यांवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे, याची जाणीव ठेवूनच भारताने भविष्यात पावले उचवावीत, ही अपेक्षा...
https://www.tarunbharat.net//Encyc/2020/6/11/Unreliable-neighbors.html