लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
 
news4_1  H x W:
 
लोणार : येथील जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील नागरिकांचे कुतूहल जागे झाले आहे. हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रूप पाहण्यासाठी सरोवराच्या काठी गर्दी केली होती.
हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. दरम्यान, तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा रंग कशामुळे बदलला याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे.
पाणी गुलाबी होणे हे नैसर्गिक : प्रा. बुगदाणे
लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होणे हे नैसर्गिक असल्याचे मत सरोवराचे गाढे अभ्यासक व सरोवर संरक्षण समिती सदस्य प्रा. सुधाकर बुगदाणे व आणखी एक अभ्यासक अभिजित शुक्ल यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. त्यात मोठ्या प्रमाणात क्षार आहेत. दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमानात मोठे बदल होत आहेत. तापमान वाढल्याने पाणी मोठ्या प्रमाणात आटले. त्यामुळे क्षारांचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी पाण्याचा रंग गुलाबी झाला. आता पावसाळा सुरू झाला आणि चांगला पाऊस पडला की, पाण्याची पातळी पुन्हा वाढेल व त्याचा रंगही बदलून तो पूर्वीप्रमाणेच दिसू लागेल असे त्यांनी सांगितले.
संबंधित विभागाचे दुर्लक्ष
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलढाणा येथील भूजल सर्वेक्षण विभागाला या सरोवरोच्या पाण्याचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, संबंधित विभाग त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तेव्हा, या विभागाने दरमहा सरोवरातील पाण्याचा अहवाल सार्वजनिक केल्यास त्याचा अभ्यासकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.