चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचाकापूस, मका, ज्वारी त्वरीत खरेदी करा

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
आ.मंगेश चव्हाण यांची सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी

 mla chavan_1  H
 
चाळीसगाव : तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा कापूस, मका, ज्वारी शिल्लक आहे. अवकाळी पावसामुळे खचलेल्या शेतकरी यांच्या शेतीमालाला शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र तालुक्यातील एकमेव सत्यम कोटेक्स हे सीसीआय शासकीय कापूस खरेदी केंद्र पावसाचे कारण दाखवून बंद असल्याने खाजगी व्यापार्‍यांकडून १५०० ते २००० इतक्या कमी दराने शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करून त्यांची लुट केली जात आहे.
 
शासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील २ हजार शेतकर्‍यांकडे ७८ हजार ५०० क्विंटल कापूस शिल्लक आहे. तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासकीय मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरु झाली आहे. मात्र बारदान नसल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तरी शेतकर्‍यांच्या घरात पडून असलेला कापूस, मका व ज्वारी हा शेतीमाल तात्काळ खरेदी करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू असा इशारा आ. मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे त्यांनी लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
 
 

आ. चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तालुका शेतकी संघामार्फत शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली. ती टोकन न देता अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून केवळ शेतकर्‍यांचा सात बारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जमा करून घेण्यात आले. मात्र ऑनलाईन नोंदणी करताना पुढार्‍यांच्या जवळचे शेतकरी व काही खाजगी व्यापारी यांनी संगनमत करून बनावट शेतकर्‍यांचे नाव खर्‍या शेतकर्‍यांच्या अगोदर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वात आधी नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना खरेदीपासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडे सीसीआयमार्फत चाळीसगाव तालुक्यातील सत्यम कोटेक्स, भोरस येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर दिवसाला किमान १०० शेतकर्‍यांचा कापूस मोजण्यात यावा अशी मागणी केली होती. मात्र आता दिवसाला १० ते १५ शेतकर्‍यांची होणारी खरेदी देखील बंद आहे. हा शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून यामुळे दुष्काळ, अवकाळी पाउस, कोरोना संकट यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍याचा धीर खचत आहे. आधीच एक महिना उशिराने चाळीसगाव येथील कापूस, मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. त्यात.१ जून २०२० पासून नवीन खरीप हंगाम सुरु झाला असून तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे त्यादिवसापासून लागवड सुरु करतात. त्यामुळे शेतकर्‍यांपुढे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होणार असून घरातला कापूस, मका व ज्वारी विकली न गेल्याने हातात पैसे नसल्यास नाईलाजाने खाजगी सावकाराच्या दुष्टचक्रात अकणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.