लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
पंतप्रधान मोदी यांचे मत
 

modi2_1  H x W: 
 
नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. भारतातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित केले. यावेळी लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केले.
आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसेच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंगाली भाषेतून केली. गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे आता कमी करावे लागणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचे हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीने ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्याने पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असे म्हटले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाच वर्षांनंतर संस्था १०० वर्ष पूर्ण करणार आहे. २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच आत्मनिर्भर भारत अभियान पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्षांपूर्वी देशात एक एलईडी बल्ब ३५० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो ५० रूपयांना मिळतो. आता कोट्यवधी लोक एलईडी बल्बचा वापर करत आहेत. यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि त्याचा फायदाही झाला. तसेच यामुळे वीजेचे बिलही कमी झाले असून पर्यावरणालाही त्याचा फायदा झाल्याचे मोदी म्हणाले.