तेल विहिरीची आग अजूनही धुमसतच

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू
 
 
news1_1  H x W:
 
तिनसुकिया : मागील 15 दिवसांपासून आगीने धुमसत असलेल्या ऑईल इंडिया कंपनीच्या बाघजन येथील नैसर्गिक वायू विहिरीच्या परिसरात दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती कंपनी सूत्रांनी आज दिली. घटनास्थळ हे राजधानीपासून पूर्वेला 500 किमी अंतरावर आहे.
माहितीनुसार, आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील बागजन येथील वायू विहिरीला 15 दिवसांपूर्वी आग लागलेली आहे. ती अद्यापही नियंत्रणात आली नसून अग्निशमन विभागाचे अनेक जवान प्रयत्नरत आहेत. दरम्यान, कंपनीच्या अग्निशमन विभागात सहाय्यक पदावर असलेले दुर्लोव गोगई आणि टिकेश्वर गोहेन हे दोघे मंगळवारी घटनास्थळावरून नाहीसे झाले होते. आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला त्यांची शवे आढळून आलीत, अशी माहिती ऑईल इंडियाचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यांच्या शरीरावर जळाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसून त्यांनी आगीच्या ज्वाळापासून बचावासाठी पाण्यात उडी मारली असावी, असे प्राथमिक रीत्या दिसून येते. शवविच्छेदन अहवालातूनच खरे कारण समजून येईल, असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी बोलून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आणि एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी विनंती आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना केली होती, असे सोनोवाल यांनी सांगितले. सोनोवाल माहिती देताना पुढे म्हणाले की, या भीषण आगीत चार तेल कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यातील २ जणांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत, असे सोनोवाल म्हणाले.
दरम्यान, मे महिन्यापर्यंत 3,871 मीटर्स खोल या विहिरीतून दरदिवशी एक लाख स्टँडर्ड क्युबिक मीटर्स (एसीएडी) इतक्या प्रमाणात वायूचे उत्पादन घेतले जात होते. मंगळवारी विहिरीला लागलेल्या आगीच्या ज्वाळा 10 किलोमीटर्स अंतराहून दिसत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.