आमदार, महापौरांसह २२ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन, जमावबंदीत केले आंदोलन
 
 
Fir_1  H x W: 0 
 
जळगाव, ११ जून
कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी, प्रशासनाचा निषेध केल्याच्या प्रकरणात आ. सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह २२ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री जमावबंदी व साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
कोरोनाबाधित मालती नेहते या बेपत्ता वृध्देचा कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आल्याने आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले होते.
 
 
यावेळी या पदाधिकार्यांनी ‘भोंगळ कारभार करणारे अधीष्ठाता, जिल्हाधिकारी गो’ अशी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करुन जोरजोरात आरडाओरड केली. विना परवानगी गर्दी व आंदोलन करु नये असे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही या पदाधिकार्‍यांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसवेक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पितांबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेश उल्लंघन, भादंवि कलम १८८, ११४३, २६९ अन्वये सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
 
bhole_1  H x W:
ही तर शासनाकडून मुस्कटदाबी ः आ.भोळे
कोरोनाग्रस्त वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी व्हावी आणि संबंधितावर कठोर कारवाई करावी, यासाठी अधिष्ठात्यांना शांतपणे निवेदन दिले. याप्रकरणी शासनाने संबंधितावर कारवाई करावी. तसेच याबाबत योग्य उपाययोजना करायला हव्यात. याउलट सनदशीन मार्गाने निवेदन देणार्‍यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे आ.सुरेश भोळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले. शासनाविरुद्ध कोणी आवाज उठविल्यास त्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असून अशा गुन्ह्याबाबत घाबरत नाही. शासनाचा मनमानी कारभार सुरु असून कोरोना रुग्णांच्या सोई-सुविधेबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रशासनास निधी उपलब्ध असूनसुद्धा तो खर्च होत नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते, असेही ते म्हणाले.
 

Bharti Sonwane_1 &nb 
 
जनतेसाठी सुरुच राहणार आंदोलन ः महापौर
शहरासह जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात जास्त असून तो आकडा दररोज वाढतच आहे. याबाबत शासन काही उपाययोजना करीत नसून जाब विचारणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहे. जनतेसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी अशाप्रकारचे निवेदन, आंदोलन सुरुच राहील, असे मनपा महापौर भारती कैलास सोनवणे यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले. एका वृद्धेचा मृतदेह ८ दिवसांपासून रुग्णालयातील शौचालयात पडून असतोे. यावरुन प्रशासन कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट दिसते. प्रशासन या भोंगळ कारभाराकडे लक्ष न देता मनमानीपणे काम करीत आहे, असेही महापौर भारती सोनवणे म्हणाल्या.