डॉ.पाटील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर होणार उपचार

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |

dr patil hosplital_1 
 
जळगाव, ९ जून
कोरोना विषाणूबाधित व संशयित रुग्णांवरील उपचाराकरीता जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४०० बेडस अधिग्रहित करण्यात आले आहेत. यात २८ आयसीयू व १५० ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसचा समावेश आहे. या रुग्णालयात ११ जून पासून संबंधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
 
 
जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सध्या उपचार घेत असलेल्या भविष्यात उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांवर उपचाराकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल अँड जनरल हॉस्पिटल, हे वैद्यकीय उपचारांसाठी अत्यावश्यक बाब म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अधिग्रहित करण्यात आले असून ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील ४०० बेडस डेडिकेटेड हॉस्पिटल करिता अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. तसेच ८ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालय व्यवस्थापनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत या योजनेत समाविष्ट असणार्‍या सर्व आजारांवर उपचार घेण्याची मुभा नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून दिल्याबाबत संबंधित रुग्णालयांना अवगत केले आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व नोडल अधिकार्‍यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना (कोविड १९ बाधित, संशयित रुग्ण वगळून) डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या उपचाराच्या अत्यावश्यक सेवा ७ जून रोजीच्या आदेशाच्या पूर्वस्थितीप्रमाणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रथमत: तेथील ४०० बेडस हे कोविड बाधित, संशयित रुग्णांकरीता उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
 
 
रुग्णालयात वरील नमूद केलेले ४० ० बेडस वगळता उपलब्ध असलेले बेडस, अन्य अत्यावश्यक सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच अन्य रुग्णांसाठी (कोरोना विषाणूमुळे बाधित, संशयित रुग्ण वगळून) उपलब्ध असतील. रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना कोविड बाधित रुग्णांवर उपचार याविषयी प्रशिक्षण द्यावे, असेही ते
म्हणाले.