जिल्ह्यात पोलिसिंग सक्षम करुन गुन्हेगारांवर ठेवणार वचक

    दिनांक : 10-Oct-2020
Total Views |
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी साधला ‘तरुण भारत’शी संवाद
 
sp 1_1  H x W:
 
जळगाव : सर्वंसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी एक भीती निर्माण झाली आहे. पोलिसात तक्रार घेवून येणारा प्रत्येक नागरिक आपलाच आहे या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे. नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असलेली संवेदना कायम रहावी, तसेच फोफावलेल्या गुन्हेगारीवर वचक रहावा यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मचार्‍यांद्वारे पोलिसिंग वाढवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘तरुण भारत’च्या सहकार्‍यांसोबत दिलखुलास संवाद साधतांना ते म्हणाले की, जिल्ह्यात येण्यापूर्वी मी रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावली. हा जिल्हा जळगावच्या तुलनेत छोटा आणि शांतताप्रिय असलेला जिल्हा होता. मात्र जळगाव हा आव्हानात्मक जिल्हा असून संवेदनशील जिल्हा अशी त्याची ओळख आहे. यातच जळगाव, भुसावळ, रावेर व चोपडा ही अती संवेदनशील शहरे आहेत. काही महिन्यांपूर्वी रावेर येथे झालेल्या दंगलीतील संशयितांवर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्या दंगलीतील सुमारे पाच जणांवर एमपीडीएची कारवाई करुन पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर वचक निर्माण करीत असल्याचे ते म्हणाले.
नाकाबंदी करुन अवैध वाहतूक रोखणार
राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतांना शहरात मोठया प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्री केली जाते. जिल्ह्याशेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेशमधून जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्य वाहतूक केली जाते. त्यामुळे सीमांतर्गत भागात चेक पोस्ट आणि नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनाची तपासणी करणे आवश्यक आहे. याबाबतचे नियोजन केले असून जिल्ह्यात येणार्‍या वाहनांची तपासणी करुन जिल्हा गुटखामुक्त करणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.
 
sp 2_1  H x W:
 
फिडबॅक सिस्टिममुळे होतो संवाद
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दिवसभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती माझ्याकडे सादर केली जाते. मी प्रत्येक विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांना त्यांच्याकडे असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादींना फोन करुन गुन्हा दाखल करण्यास काही अडचणी आल्या का?, तुम्हाला काही अडचणी आहेत का? यासह गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दररोज उपविभागीय अधिकारी फिडबॅक सिस्टीमचा अवलंब करुन सर्वसामान्यांसोबत संवाद साधून काम करीत आहेत.
जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजनेला सुरुवात
नाशिक विभागाचे नूतन पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर हे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजनेची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. यात प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याला आपल्या हद्दीत असलेल्या सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून या योजनच्या अंमलबजावणीस सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगारांची यादी तयार
पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांसह अट्टल चोरटे, हिस्ट्रीशिटर अशा वेगवेगळ्या चोरांची यादीच तयार करण्यात आली आहे. यात समाजासाठी घातक ठरणार्‍यांची यादी प्रशासनाच्या मदतीने तयार झाली आहे. त्याच्याविरुद्ध अजून काही गुन्ह्यांची नोंद झाल्यास त्याच्यावर कायद्यातील अतिरिक्त कलमांनुसार कडक कारवाई करुन लक्ष ठेवणार असल्याचे डॉ. मुंढे म्हणाले.
जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांवर नजर
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र सर्व व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहे. यातच अनेक जण बेरोजगार झाल्याने त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबिला आहे. यामध्ये जिल्ह्यांतर्गत कारवाई देखील वाढल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी पोलीस दल अधिक बळकट बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करुन जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांवर देखील नजर ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा तयार करा
गुन्हेगारी कमी करण्यासाठी कायद्यात अनेक कलमे आहे. गुन्हेगारामुळे समाजातील वातावरण दूषित होवू नये म्हणून प्रत्येक पोलिसाने त्याचा वापर केला पाहिजे. मी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देवून कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवित आहे. पोलिसांनी नियमानुसार काम केले तर इतर कुठल्याही योजना न राबविताही गुन्हेगारीला आळा घातला जावू शकतो, यावर माझा विश्‍वास आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक कर्मचार्‍याने आपल्यात सुधारणा करुन सर्वसामान्यांमध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. मुंढे यांनी केले.
सण, उत्सव साधेपणाने साजरे करा
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सण, उत्सव देखील साधेपणाने साजरे करावेत, घराबाहेर पडतांना विनामास्क जावू नये. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा. काही तक्रार असल्यात तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधून प्रशासनाची मदत घ्यावी. पोलीस प्रशासन सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी असल्याने ते गुन्हेगारांना कधीही पाठीशी घालणार नाही हेही तेवढेच खरे अशा शब्दात त्यांनी आपला भविष्यातील मनोदय बोलून दाखविला.
‘तरुण भारत’चे निवासी संपादक दिनेश दगडकर यांनी ‘तरुण भारत’चे विशेषांक आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ मधील सहकारी उपस्थित
होते.