मोहम्मद शमी या वर्षीचा सर्वात यशस्वी गोलंदाज

    दिनांक : 02-Jan-2020
नवी दिल्ली: भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यांमध्ये गडी बाद करण्यात यंदाचा सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला. त्याने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 गड्यांना बाद केले. विश्वचषक स्पर्धेसह वर्षात झालेल्या सामन्यांमध्ये जलदगती गोलंदाजांची कामगिरी सर्वांत चांगली दिसली. शामीपाठोपाठ कुलदीप यादव (32 गडी) आणि यजुवेंद्र चहल (29 गडी) या दोन फिरकी गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली.
 
 
h_1  H x W: 0 x
 
 
भारताचे शमी, भुवनेश्वर कुमार यांच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान या पहिल्या पाच गोलंदाजांचा सर्वांत जास्त गडी बाद करणार्‍यांमध्ये समावेश आहे. 21 सामन्यांमध्ये 42 गडी बाद करून मोहम्मद शमी वर्षातील सर्वांत जास्त गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळविला आहे. शामीने दुसर्‍यांदा हा मान मिळविला आहे. 2014 मध्ये 38 गडी बाद करून त्याने, गडी बाद करण्यामध्ये असाच प्रथम येण्याचा मान मिळविला होता. संपूर्ण वर्षभर शामी यशस्वी राहिला. वर्षभरात फक्त तीनच वेळा असे झाले की, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
 
 
अव्वल गोलंदाजांनी जास्तीत जास्त गडी विश्वचषक स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यांदरम्यान टिपले. मोहम्मद शमीला त्या मानाने कमी संधी मिळाल्या. परंतु मिळालेल्या संधींचे सोने करीत त्याने विश्वचषक स्पर्धेमधील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील हॅट्‌ट्रिकसह सरासरी 13.78 धावा देत 14 गडी बाद केले. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात शामीने 69 धावा देऊन बाद केलेले 5 गडी वर्षातील त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने 20 सामन्यांमध्ये 38 गडी बाद करीत द्वितीय स्थान पटकाविले. एका षटकात 4.70 च्या सरासरीने धावा देऊन बोल्ट सर्वांत किफायतशीर गोलंदाज ठरला. 10 षटकांमधील चार निर्धाव षटके टाकून 21 धावांमध्ये पाच गडी बाद करण्याची त्याची यंदा उत्कृष्ट कामगिरी ठरली. लॉकी फर्ग्युसनने 17 सामन्यांमध्ये 35 गडी बाद करून तृतीय स्थान मिळविले. फर्ग्युसनने गोलंदाजीच्या गतीच्या जोरावर वर्षभर फलंदाजांना जेरीस आणले.
 
 
विश्वचषक स्पर्धेमध्ये 37 धावा देऊन चार गडी बाद करण्याची त्याची कामगिरी वर्षातील उत्कृष्ट राहिली. 16 सामन्यांमध्ये 34 गडी बाद करणारा बांगलादेशचा डावखुरा गोलंदाज मुस्तफिझूर रहमान चौथ्या स्थानावर राहिला. मुस्तफिझूर रहमानने देखील विश्वचषक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. 2019 वर्षात सर्वांत जास्त गडी बाद करणार्‍यांच्या यादीत भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाचवे स्थान प्राप्त केले. त्याने 19 सामन्यांमध्ये 33 गडी बाद केले. वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमधील सामन्यात भुवनेश्वर कुमारने 31 धावा देऊन 4 गडी बाद करण्याची कामगिरी वर्षातील सर्वोत्कृष्ट ठरली.