खुनशी सरकार!

    दिनांक : 02-Jan-2020
नागेश दाचेवार
 
सरकार बदलले की आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय कसे चुकीचे होते, त्यांनी राबविलेल्या प्रकल्पांमध्ये कसा गैरप्रकार झाला, याबाबत नवे सरकार काथ्याकूट करत बसते. किंबहुना बरेचदा आपल्या विरोधकांना बदनाम करण्याचा किंवा त्यांची कोंडी करण्याचा सत्ताधार्‍यांचा हेतू असतो, असे आजवर दिसून आले आहे. असाच काहीसा प्रकार अलिकडेही राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यापासून बघायला मिळत आहे. जनतेचे हित ध्यानी घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे सोडून बदल्याचे राजकारण केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. प्रत्यक्षात तीन पक्षांनी आपल्या वचन, शपथनाम्यातून जनतेला दिलेल्या शब्दांना पाळण्याची आणि जागण्याची ‘हीच ती वेळ’ असताना, हे सरकार मात्र, केवळ खुनशी राजकारणात व्यग्र आहे.
 

l_1  H x W: 0 x 
 
प्रत्यक्षात शिवसेनेने आपला वचननामा तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीने आपला शपथनामा निवडणुकीपूर्वी जाहीर केला होता. यातील मुद्यांवर नजर टाकल्यास बरेच कार्य करण्यास या महाविकास आघाडीच्या सरकारकडे व्याप्ती, संधी, वाव, मोकळीक आहे. महत्त्वाचे म्हणजे या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेने तर ‘एकही वचन खोटं ठरणार नाही,’ असे सांगत आपला वचननामा जाहीर केला होता. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले होते की, राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला आहे. जेव्हा राज्याच्या तिजोरीचा सारासार विचार करून वचनं दिली गेली होती तर, मग आज अचानक राज्याची तिजोरी खाली आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे केंद्राने मदत दिल्यास आम्ही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत देऊ, अशा बाजारगप्पा कशाला उठविल्या जात आहेत. इथे केवळ पहिले संकट ओढावल्या-ओढावल्या राज्य डबघाईस आल्याची उपरती झाली. मग गेली पाच वर्षे सत्तेत असताना तुमचे अर्थ राज्यमंत्री गोट्या खेळत होते की काय? राज्याचा अर्थसंकल्प विधानपरिषदेत सादर करताना आणि त्या अगोदर तो तयार करताना, शेवटचा हात फिरवताना केवळ फोटोसेशनसाठी मॉडल म्हणून उभे होण्याइतकीच भूमिका तेवढी त्यांना निभवायला दिली होती की आपण वचने देतेवेळी राज्याच्या तिजोरीचा अभ्यास करताना त्यांना गृहीतच धरले नाही. या सर्व विरोधाभासी भूमिका आणि आपल्या कृतीतून सरळसरळ अर्थ असाच निघतो, एकतर तुम्ही राज्याच्या तिजोरीचा अभ्यास न करता राज्याच्या जनतेला खोटी वचने दिलीत आणि वरून अभ्यास केल्याचे देखील जनतेशी खोटे बोललात. एकीकडे भारतीय जनता पक्ष आम्हाला खोटारडे ठरवायला निघाला असल्याची आवई आपणच सत्तास्थापनेच्या चाललेल्या संपूर्ण खेळखंडोब्यादरम्यान उठवली होती. मात्र, आता भाजपाला काही करण्याची गरजच राहिलेली नाही. शिवसेना तशीच जनतेसमोर केवळ उघडीच पडणार नाही तर, भविष्यात नागडी देखील होईल.
 
शेतकर्‍यांचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. तोच शेतकरी पुन्हा नव्या संकटाला तोंड देत आहे. आता पुन्हा नुकसानभरपाईचे नाव काढू नका, असे सांगता येणार नाही. आणि वरून केंद्र सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आता कायच करावे, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. प्रत्यक्षात उशिरा का होईना, पण तुमच्या डोक्यात प्रकाश पडला, असे म्हणायला हरकत नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात राज्याची तिजोरी खाली करून ठेवल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वात तुम्ही सामील असलेले महायुतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा पाच वर्षांत चार वेळा अशा परिस्थितीचा सामना या सरकारला करावा लागला. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने नियोजन करून एकहाती हे संकट हाताळले आणि तुम्हाला याची साधी झळ देखील पोहचू दिली नाही. प्रत्यक्षात संकटातल्या शेतकर्‍याला कशी मदत केली पाहिजे, हे शिकायची संधी तुम्हाला मागील पाच वर्षांच्या काळात आपसूकच उपलब्ध झाली होती. पण प्रत्येक संकट देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करून, स्वतः नामानिराळे राहून, उलटपक्षी आपण शहाणपणा शिकवत राहिलात. त्यामुळे आता स्वतः जबाबदारी पार पाडायची वेळ आल्यानंतर काही सुचेनासे झाले आहे. आणि परत एकदा पुन्हा जुन्याच कृतीची री ओढत तीच भूमिका कायम ठेवत यावेळी केंद्र सरकारवर खापर फोडून स्वतः नामानिराळे राहण्याच्या प्रयत्नात आपण आहात. मात्र, राज्यातील जनता मूर्ख नाही. केंद्र सरकारने आजवरची सर्वात मोठी मदत महाराष्ट्राला केली आहे. आजही तत्कालीन राज्य सरकारने पाठविलेलाच 14 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. या सरकारने पुनः प्रस्ताव पाठविण्याची साधी तसदी देखील घेतली नाही. एवढेच नव्हे तर, तत्कालीन सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा देखील केला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीचे पत्र पुढे सरसावून पाठविणार्‍या या सरकारला शेतकर्‍यांविषयी एवढाच कळवळा होता तर, या पत्रापेक्षा शेतकर्‍यांसाठी पत्रव्यवहार करण्याला प्राधान्य यांनी दिले असते. मात्र, यांना केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजकारण तेवढे करायचे आहे, हे या निमित्ताने अधोरेखित होते.
 
 
शेतकर्‍यांना कर्जमाफी नव्हे कर्जमुक्तीचे दिलेले वचन तर फसले. आता शेतकरी हिताचे शेतकर्‍यांना दिलेले दुसरे वचन, काय तर, ते यात्राबित्रा काढून अर्ंतभूत केलेला विषय आहे म्हणे... अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला 10 हजार रुपये जमा करणार, सातबारा कोरा करणार, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार देणार, या सर्व मागण्यांसाठी महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना फार आग्रही आणि आक्रमक देखील होती. आता तर, दोन लाखांची घोषणा केल्यानंतर ज्या पद्धतीने या विषयाला बगल दिली जात आहे. त्यावरून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘मूग गिळून बसणे’ या वाक्यप्रचाराचा अत्यंत विश्लेषणात्मक पद्धतीने सांगितलेला अर्थ येथे तंतोतंत लागू होताना दिसत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
दुसरीकडे शेतकरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने, बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचे दिलेले आश्वासन आणि परत शिवसेनेने दिलेले घरगुती वापरातील विजेसाठी 300 युनिटपर्यंत दर कमी करणे आदी आश्वासने तर अद्याप अडगळी पडलेलीच आहेत. एक ना अनेक वचने दिलेल्या या सरकारकडे बरीचशी प्राथमिकतेची कामे समोर उभी ठाकलेली असताना, हे सरकार काय करत आहे तर, देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फेरआढावा घेण्यात वेळ आणि कष्ट वाया घालवत आहे. 2018 मधील कामांचे 32 हजार उपयोगिता प्रमाणपत्र न मिळाल्याने 65 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात मग्न आहेत. प्रत्यक्षात 2012 मध्ये 1 लाख 95 हजार 718 एवढी 88 हजार दोनशे 40 कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केल्या गेली नव्हती, त्याखालोखाल 2011 मध्ये 1 लाख 83 हजार 963 एवढी 73 हजार 118 कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केलेली नव्हती. अशी बरीच मोठी उपयोगिता प्रमाणपत्रांबाबतची आकडेवारी आघाडी सरकारच्या काळातली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मत काय? हे जनतेला कळले पाहिजे. प्रत्यक्षात भाजपाला डावलून मुख्यमंत्रिपद मिळवून, आता भाजपाला डिवचून बोलणे, टोमणे मारणे, वेगवेगळे आरोप लावणे, त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करणे, यात धन्यता मानण्यात कदाचित शिवसेनेला आज आनंद आणि रस वाटत आहे. शिवसेना खुनशी राजकारणाच्या इतक्या आहारी गेलेली आहे की, आपल्या कृतीतून, आपल्याला किंवा राज्याला काही मिळते की नाही यापेक्षा भाजपाला दुःखते की नाही यात जास्त धन्यता मानत आहे. मात्र, ते करताना शिवसेना आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेत आहे, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच.
 
9270333886