नवीन वर्षारंभी भूसावळ शहराला विकासाची अपेक्षा ; 19 वर्षात नवीन व्यापार संकुल नाही

    दिनांक : 01-Jan-2020
भुसावळ - सुमारे १९ वर्षांपासून शहरात कोणतेही नवीन व्यापार संकुल बांधले गेलेले नाही. गेल्या ३ वर्षांत सत्ताधार्‍यांनी केलेली विकास कामे जनतेच्या नजरेत भरत नाहीत यामुळे २०२० मध्ये तरी भुसावळ नगर पालिका विकास कामे गतीने करेल अशी अपेक्षा आहे.
 
 
आ. संजय सावकारे हे पालकमंत्री असतांना नगर परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यांनी व नगराध्यक्षांनी पाठपुरावा करुन अमृत योजना, मरिमाता रोडवरील विजवाहिन्या भुमिगत करणे अशी अनेक कामे मंजूर करुन आणली होती. ती सर्व कामे गेल्या दोन वर्षांत शहरात सुरु झाली. शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या तरी जनता समाधानी असते. परंतु नगर परिषदेचे प्रशासन त्यात अपयशी ठरले आहे. न.प. मध्ये माजी आ. संतोष चौधरी यांच्या समर्थकांची सत्ता असतांना स्थिती व विद्यमान स्थितीची तुलना जनता करु लागली आहे.
 

j_1  H x W: 0 x 
 
शहर व तालुक्यात रोजगाराची कमी
भुसावळ नगर पालिका ही अ दर्जा असलेली नगर परिषद आहे. २००१ च्या जनगणने नुसार १ लाख ७२ हजार ३६६ लोकसंख्या शहराची आहे. शहरातील लोकसंख्येचा आणि कुटुंबांचा विचार केल्यास सुशिक्षीत कुटुंबातील प्रत्येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या कुटुंबातील किमान एक व्यक्ती पोटापाण्यासाठी तालुक्याच्या बाहेर गेली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या परिसरात अनेक घरांमध्ये केवळ मातापिता वास्तव्यास आहे. शहरात व तालुक्यात युवकांसाठी रोजगार उपलब्ध होवू शकला नाही. खडका येथील सूत गिरणी बंद आहे. एमआयडीसीमध्ये कंपन्यंाची प्रतीक्षा आहे. दीपनगर येथे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने कामगार ठेवले जातात.
 
वातनुकूलित व्यापार सकुंलाची प्रतीक्षा
शहरात वसंत टॉकिज समोर नगर पालिकेची शाळा होती. ही शाळा तोडून तेथे वातानुकूलित व्यापार संकुल होणार असल्याचे किमान दिड दशकापासून नागरिकांच्या ऐकण्यात आहे, परंतु व्यापार संकुल अद्याप उभारले गेले नाही. 
 
शहरात उभारलेले व्यापार संकुल
१९९८ ते २००१ या कालावधीत संत गाडगेबाबा म्युनिसिपल मार्केट, स्व. छबिलदास चौधरी व्यापार संकुल, संतसेना महाराज व्यापार संकुल, शाहीर अण्णाभाऊ साठे, संत जगनाडे महाराज, संत रोहिदास, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, स्व. मोटूमल चांदवाणी, महात्मा गांधी, महर्षी वाल्मिकी, सरदार वल्लभभाई पटेल, स्व. नारायण पाटील, शहीद अ. हमीद, श्री छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षण क्र १०६ मध्ये व्यापार संकुल उभारण्यात आले. या सर्व व्यापार संकुलांमध्ये ६९५ गाळे उपलब्ध झाली. ही सर्व गाळे नगर परिषदेने नागरिकांना वापरासाठी देवून त्यांच्याकडून ६ कोटी ६१ लाख ५० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली तर व्यापार संकुल बांधण्यासाठी ४ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपये खर्च आला होता. त्यामुळे नगर परिषदेने दुकाने बांधाण्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून खर्च न करता दुकान संकुल उभारणी केले. नगर परिषदेची भली मोठी मालमत्ता या निमित्ताने तयार झाली आहे. लाखो रुपयांचा महसूल वर्षाकाठी नगर परिषदेस मिळत असतो.
 
आहे तीच व्यापार संकुले निट सांभाळली तरी पुरेसे
शहरातील अनेक व्यापार संकुलात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. अनेक ठिकाणी दुकानांचे स्लॅब, जीने, वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. शिवाजी महाराज व्यापार संकुलात संदीप चौधरी यांच्या दुकानाचे छत काही वर्षांपूर्वी कोसळले होते. ईलेक्ट्रीकच्या वायर लोंबकळत असतात. त्यामुळे प्रशासन नवीन व्यापार संकुल बांधत नसले तरी जी आहेत तीच सांभाळाली तरी पुरेसे होणार आहे.
 
सत्ताधार्‍यांचा न.प. निधी वापरावरच जोर
शहरात माजी आ. संतोष चौधरी व भा.ज.पा. यांच्यात चुरस आहे. सध्या पालिकेची सत्ता भा.ज.पा.च्या ताब्यात असून सत्ताधार्‍यांनी शासकीय योजनांचा वापर करण्यापेक्षा न.प.चा निधीच वापरण्यात धन्यता मानली.
-----
दारुड्यांच्या त्रासामुळे व्यावसायिकांचे स्थलांतर
नगर परिषदेच्या रुग्णालयास लागून असलेल्या व्यापार संकुलात पहिल्या मजल्यावर दारुड्यांचा प्रचंड त्रास असल्याने तेथील व्यावसायिकांनी त्रासासमोर शरणागती पत्करुन तेथून स्थलांतर करणे पसंत केले.
-----
 
उद्योगांसाठी पाठपुरावा करु
राज्यात उद्योग मंत्री शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडे येथील एमआयडीसीमध्ये उद्योग आणि कंपन्या आणण्यासाठी निवेदने देवून पाठपुरावा करु. बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे.
- सुरज पाटील, युवा सेना शहर प्रमुख
------
सत्ताधार्‍यांचे अपयश आहे
माजी आ. संतोष चौधरी हे त्या पक्षात होते त्याच पक्षाची राज्यात सत्ता होती . त्याचा पुरेपूर वापर करुन शहराचा विकास केला. मागच्या ३ वर्षात राज्यात भा.ज.पा.ची सत्ता असून व नगर परिषदसुध्दा त्यांच्यात ताब्यात असून त्यांना विकास करता आला नाही हे त्यांचे अपयश आहे.
- उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष
----
नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.