बत्तीस मण सुवर्णसिंहासन : एक राष्ट्रजागरण अभियान
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 
 
छत्रपती शिवरायांची गणना भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरूषात होते. निष्ठावंत, कर्तव्यनिष्ठ, असामान्य मुत्सद्दी, रणझुंजार, सेनानायक हे त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू आहेत. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने ते भारलेले होते. त्यांनी समाजापुढे एक जीवनध्येय ठेवले जीवनात श्रेयस आणि प्रेयस काय व प्रसंगी प्राणार्पण करून ध्येय कसे जपावे याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या आचरणातून दिला. न्याय, नीती, सहिष्णुता व उदारमतवादावर आधारलेले कल्याणकारी राज्य साकार व्हावे ही त्यांची आकांक्षा होती.
 
 
शिवाजी महाराज उत्कृष्ट सैनिक योद्धे, सेनानी होते. सैन्याच्या चपळ हालचाली, दक्ष हेरखाते, संरक्षण सज्जतेकडे लक्ष, गनिमी कावा, डावपेच, कुशल युध्दनीती यांच्या बळावर त्यांनी शत्रूला नामोहरण केले.
 
 
विजापूरच्या अदिलशाहीतील एका सरंजामी सरदाराचा मुलगा बलाढ्य मोगल सत्तेला आव्हान देवून हिंदवी स्वराज्य निर्माण करील अशी कल्पनाही कुणाला आली नसेल. त्यांचा लढा असहिष्णुता, अन्याय व वांशिक दुराभिमानाविरूध्द होता. त्यांनी राजपूत, बुंदेले व इतरांच्या मनात स्वत्व, स्वाभिमानाची जाणीव निर्माण करून त्यांना लढण्याची प्रेरणा दिली.
 
 
महाराजांच्या जन्मावेळी महाराष्ट्रभर दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखला जाणारा प्रचंड दुष्काळ पडला होता. पाचही पातशहांच्या जुलमी राजवटीच्या वरवंट्याखाली जनता भरडून निघत होती. प्रचंड साधनसामग्री असलेल्या बलाढ्य शत्रूला मर्यादित साधनांच्या आधारे टक्कर देतांना शत्रूंच्या मर्मस्थानांचा त्यांनी बरोबर फायदा घेतला १६७७ मधील नाशिक बागलाणामधील त्यांची मोहीम म्हणजे त्यांच्या लष्करी डावपेचांचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल.
 
 
शिवराज्याभिषेकामुळे स्वतःला हिंदूपदपादशहा मानणारा एक हिंदू राजा स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करतो ही आत्मसन्मानाची भावना उभ्या देशाला ललामभूत ठरली. स्वतःचे स्वतंत्र चलन त्यांनी सुरू केले.स्वतःचा शक सुरू केला. छत्रसाल, बुंदेलांना शस्त्रविद्या शिकवून आशीर्वाद दिला. बुंदेलखंडातील स्वराज्य स्थापनेस प्रोत्साहन दिले.
 
 
बत्तीस मण सुवर्णाचे रत्नजडीत तख्त निर्माण केले. सिंहासनास आठ खांब जडविले. सप्त नद्यांच्या उदकांनी आठ सुवर्णकलश व आठ सुवर्ण तांब्यांनी अष्टप्रधानांनी महाराजांना अभिषेक केला. या राज्याभिषेकास एक कोटी बेचाळीस लक्ष होनांचा खर्च आला. अष्टप्रधानांना प्रत्येकी एक लक्ष होन, हत्ती, घोडा, वस्त्रे व अलंकार देवून गौरविण्यात आले. अशा आशायाचे वर्णन करून सभासदाने म्हटले आहे की, ‘‘मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही’’ हेन्दी ऑक्झेक्टनेही या भव्य राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन केले आहे. राज्याभिषेकानंतर राजांनी अविरत पराक्रम करून गडकोट किल्ल्यांची तटबंदी अभेद्य केली.
 
 
आज देशाच्या सागरी सीमा असुरक्षित होत आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक आहे.‘‘अशीच असती आई अमुची सुंदर रूपवती | आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती’’ असे म्हणणारे व स्त्रियांच्या शीलांचे रक्षण करणारे राज्यकर्ते आज हवे आहेत. फंद-फितुरी करणार्‍या व बदअंमल करणार्‍या स्वकियांना कडक शासन करणारे, बजाजी निंबाळकर व नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेवून त्यांचे शुध्दीकरण करणारे, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे याचे भान ठेवणारे, स्वराज्याकडे बारकाईने लक्ष देवून देशाच्या शत्रूचा समूळ उच्छेद करणारे, देशाच्या मानबिंदूसाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण देणारे, देशभक्तीची भावना प्रज्ज्वालित करणारे शिवराय आज प्रकर्षाने आठवतात. देशाचे गतवैभव प्राप्त करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करणारी पिढी घडविणे हेच होय. ३२ मण सुवर्णसिंहासनाची प्रतिष्ठापना केल्यावर समाजात देव-देश- धर्म याविषयी आदरभाव निर्माण होवून समाजाचा आत्मसन्मान जागृत होईल.
 
 
अस्मिता जागृत झालेला समाज परकीयांची मानसिक, आर्थिक गुलामगिरी व पाश्‍चात्यांचे अंधानुकरण नाकारेल. स्वराज्य व सुराज्याविषयी सार्थ अभिमान निर्माण होईल. देशाच्या हितशत्रूंना पुन्हा जरब बसेल. औरंगजेबाच्या चरित्रकारालासुध्दा शिवराय अतुलनीय वाटतात. त्यांचे जीवन महाकाव्यसदृश वाटते. शिवरायांचे मावळे पराभूत होतातच कसे ? हा प्रश्‍न परकीयांना पडतो. आजही त्यांची युद्धनीती पाश्‍चात्य देशात शिकवली जाते शिवरायांच्या विस्मरणामुळेच आज देश रसातळाला चालला आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. सुवर्णसिंहासनाची स्थापना झाल्यावर जनतेच्या मनात स्वराज्याविषयी आत्मियता निर्माण होईल व त्यातूनच अनेक समस्यांची उकल करण्याचा प्रभावी मार्ग दृष्टोत्पत्तीस येईल या भावनेतून हे राष्ट्रहिताचे कार्य शिवप्रतिष्ठानने हाती घेतले आहे.
 
- सुहास व्यंकटेश कुलकर्णी
७७९८२५४३२४