मुंबईत सोमवारपासून आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019

देशातील रामायण सर्किटच्या पर्यटन विकासाला महोत्सवातून मोठी चालना मिळेल - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

 
 
मुंबई, दि. २० : पर्यटन विभागामार्फत येत्या सोमवारपासून (२५ फेब्रुवारी) मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाच्या प्रारंभिक उद्घोषणेचा कार्यक्रम वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या महोत्सवातून रामायणातील मूल्यांची जगभरातील लोकांसह आजच्या नव्या पिढीला माहिती होऊ शकेल. त्याचबरोबरच देशभरातील रामायण सर्किटच्या पर्यटन विकासाला यातून मोठी चालना मिळेल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले.
मंत्री रावल यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, रामायण मालिकेतील सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, रामायणाच्या अभ्यासक कविता काणे, आनंद नीलकंठन आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
 
भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियाचा सहभाग
पर्यटन विभाग आणि एमटीडीसीमार्फत बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव होत आहे. यात भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशिया हे देश सहभागी होणार आहेत. त्या त्या देशातील विविध स्वरुपांतील रामायणाचे सादरीकरण होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी भारतातील गणेश नाट्यालय, २६ फेब्रुवारी रोजी कंबोडियातील रॉयल बॅलेट ऑफ कंबोडिया आणि कोम्मा बसाक असोसिएशन, २७ फेब्रुवारी रोजी फिलिपाईन्समधील इंटिग्रेटेड परफॉर्मिंग आर्टस् गील्ड तर २८ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील संगार परिपूर्णा हे ग्रुप सादरीकरण करणार आहेत.
 
 
रामायण सर्किटच्या विकासासाठी १२० कोटी
मंत्री श्री. रावल म्हणाले, रामायणाचा संदर्भ असलेली राज्यातील पंचवटीपासून रामटेकपर्यंतची विविध स्थळे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत विकसित करण्यात येत आहेत. केंद्र शासनाने देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. राज्यातील रामायणाशी संदर्भित स्थळांच्या विकासासासाठी प्राथमिक टप्प्यात १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व पर्यटनस्थळांचा विकास करुन जगभरातील पर्यटकांना त्याकडे आकर्षित केले जाईल. यातून जगाला रामायणाची ओळख होण्याबरोबरच राज्याचा पर्यटन विकास आणि त्यातून रोजगारात मोठी वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल यावेळी म्हणाल्या, रामायण हा फक्त ग्रंथ नसून भारतीय जीवनमूल्यांचा तो एक सार आहे. भारतासह आग्नेय आशियातील (दक्षिण पूर्व आशिया) अनेक देश रामायणाशी जोडले गेले आहेत. रामायण महोत्सवाच्या माध्यमातून या सर्व देशांना एकत्रित आणून त्या माध्यमातून फप्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, रामायणातून आपल्याला जीवनमूल्यांची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव, स्वार्थविरहित जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते. पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात सध्या चार देश सहभागी झाले आहेत. विविध देशांना एकत्र आणण्यात रामायण महोत्सव महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रामायणाच्या अभ्यासक कविता काणे आणि आनंद नीलकंठन यांच्यासमवेत ‘रामायणाची मूल्ये आणि गुणवैशिष्ट्ये’ या विषयावर चर्चा झाली. पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/