जिल्हाधिकार्‍यांची भुसावळ तहसीलला भेट
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019

कार्यालयीन कामकाजाचा आढावा

 

 
भुसावळ, १८ फेब्रुवारी
नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी भुसावळ तहसील कार्यालयातील विविध कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकारी यांनी कामकाजाचा आढावा घेताना प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी नुकतीच जाहीर केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या तत्काळ संगणकावर लोड करून पुढील कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात खरीप हंगामातील अनुदान जमा करण्यात यावे, शासकीय कामकाजात हलगर्जीपणा न करता प्रत्येक काम वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रावेर व जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी भुसावळ तहसील आवारातील शासकीय गोदामात सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांणी पाहणी त्यांनी केली. नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तहसील कार्यालयातून बाहेर जात असताना एका लाभार्थी महिलेने जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या गाडीजवळ जाऊन अन्न सुरक्षा योजनेत माझे नाव समाविष्ट असताना रेशन दुकानदारांकडून मला धान्य दिले जात नसल्याची तोंडी तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍याला बोलावून सदर महिलेची अडचण सोडविण्याचे आदेश दिले. दोषी आढळल्यास संबंधित रेशन दुकानदारांचा परवाना रद्द करण्याच्या सूचनाही केल्या.