वाराणसी बदल रही है, मोदींनी केली वचनपूर्ती!
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 
 
वाराणसी : “सरकारने जनतेला जे वचन दिले होते, ते पूर्ण केले आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथे झालेल्या सभेत म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी वाराणसीमध्ये डिझेलमधून इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर केलेल्या जगातील पहिल्या ट्रेन इंजिनचे लोकार्पण करण्यात आले. ‘मेक इन इंडिया’ या योजनेअंतर्गत या ट्रेन इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींनी २,९०० कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
 
 
 
वाराणसीतील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स या रेल्वे कारखान्याच्या परिसरात या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधील रवीदास मंदिराला भेट दिली. २,६०० हॉर्सपॉवर्सच्या दोन युनिटच्या डिझेल इंजिनचे रुपांतर १०,००० हॉर्सपॉवर्सच्या इलेक्ट्रिक इंजिनमध्ये करण्यात आले आहे. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. अशी माहिती डीएलडब्लूचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन मल्होत्रा यांनी दिली. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO), चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स(CLW) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांमधील अभियंत्यांनी अल्पावधीत या ट्रेन इंजिनची निर्मिती केली. असे नितीन मल्होत्रा यांनी म्हटले. डिझेल इंजिनचे रुपांतर इलेक्ट्रिकल इंजिनमध्ये करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी लागणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत करण्यात आली. अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
 
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले रमेश यादव या वाराणसीच्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. “आम्ही जनतेला दिलेले वचन वेळेत पूर्ण केले. तुम्ही पाहिले असेल की, आधी १० वर्षांनी कर्जमाफी केली जायची. ५०-५५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जायची. आता आम्ही जी योजना तयार केली आहे, त्यामुळे पुढील १० वर्षांमध्ये साडे ७ लाख कोटींची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आमचे सरकार देशाच्या विकासाला दोन ट्रॅकवर एकसाथ पुढे नेत आहे.” असे मोदी म्हणाले. तसेच ‘वंदे मातरम’ या भारतातील पहिल्या सेमी-हाईस्पीडची खिल्ली उडविणाऱ्या विरोधकांना मोदींनी चांगलाच टोला लगावला. ‘वंदे मातरम’ या सेमी-हाईस्पीड ट्रेनची खिल्ली उडवणे म्हणजे देशाच्या क्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच आज सेमी हायस्पीड ट्रेन चालवली उद्या बुलेट ट्रेनही यशस्वीपणे चालवू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये काशीमध्ये केलेला विकास आणि महत्वपूर्ण बदल घडवून आणले. याचा दाखला देण्यासाठी ट्विटरवर सोशल मीडिया यूजर्सनी #BadalRahiHaiKashi अर्थात काशी आता बदलत आहे. असा हॅशटॅग चालवला आहे.