भूमिपूजन सोहळा अविस्मरणीय, ऐतिहासिक होणार : आ. उन्मेश पाटील
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
  

 
चाळीसगाव, १७ फेब्रुवारी
शहरातील सिग्नल चौकात नगरपालिकेच्यावतीने उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेचा तिढा गल्ली ते दिल्ली सत्ता आल्याने मार्गी लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जागेच्या तिढ्याबाबत आग्रह धरला होता. अखेर तो सुटला असल्याने २० रोजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ. उन्मेश पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
कोल्हापूरचे युवराज खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे हस्ते भूमिपूजन होईल. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी तालुका वासियांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ए.टी. नाना पाटील यांनी या प्रसंगी केले आहे.
 
 
भाजप तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, उपसभापती संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, माजी पं.स. सदस्य दिनेश बोरसे , भा.ज.पा. तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, भा.ज.पा. शहर उपाध्यक्ष जितेंद्र वाघ, बुथ विस्तारक प्रमुख गिरीश बरहाटे ,ऍड. प्रशांत पालवे, समाधान पाटील ,बंडू पगार, ज्ञानेश्वर कवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान खा. ए.टी.नाना पाटील यांनी पुतळा स्थापन करण्याच्या जागेची पाहणी मान्यवरांसह केली.
 
 
तालुक्याचे प्रत्येक गावातून मृदाकलश
महाराजांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ करिता सर्व पातळीवर चर्चा करून हा समारंभ अभूतपूर्व व भव्यदिव्य होण्यासाठी सर्व प्रयत्नशील असून न.पा. फंडातून व वैशिष्टपूर्ण योजनेतून यासाठी निधी उभारला आहे. तालुक्यातील सर्व खेड्यातून त्या गावाची पवित्र माती भरून आणली जाणार आहे. हा मृदा कलश व प्रभागातील आणलेल्या माती कलश, शिवस्फुर्ती गीतांचा कार्यक्रम व उमंग परिवाराच्या दीडशे महिलांच्या व मुलींच्या ढोल ताशे पथकाचे सादरीकरण केले जाणार आहे.