विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना अशी घ्या काळजी!
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 

 
 
दहावीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. वर्षभर तुम्ही अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पण सर्वांचे ध्येय एकच असेल, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत. पालकांची देखील अशीच अपेक्षा असते. त्यासाठी मग फक्त थोडेच दिवस उरलेत अभ्यास करायला. चला तर मग, या शेवटच्या काही दिवसात विद्यार्थ्यांनी कशापद्धतीने तयारी करावी, ते पाहूया...
 
 
१) प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा. जमल्यास एक कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो.
 
 
आठपर्यंत पाठांतर करा, कारण ही वेळ पाठांतरासाठी चांगली. आठनंतर आंघोळ, नाष्टा करावा आणि पुन्हा साडेआठला अभ्यासाला बसावे. आता लिखाण करावे ते दहा वाजेपर्यंत. काय लिखाण करावे तर जे पाठांतर केले ते आठवते का ते पहावे. नंतर शाळेची तयारी करावी. सायंकाळी शाळेतून आल्यावर फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्यावे आणि पुन्हा सात ते नऊ अभ्यासाला बसावे. आता मात्र मोठयाने वाचूनच अभ्यास करावा. ही वेळ मनन करण्याची नाही. कारण बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही म्हणून मोठयाने वाचून अभ्यास करावा. परत जेवण करून नऊनंतर अभ्यासाला बसून धडे अथवा गाईड पाहून लिहिण्याचा सराव करावा. हा अभ्यास अकरा वाजेपर्यंत करावा. यात थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. पाच ते सहा तास झोप पुरेशी होते. उगीचच रात्रभर जागू नये, त्याने प्रकृतीवर परिणाम होते, परीक्षा देण्यासाठी आरोग्य ठीक पाहिजे ना?
 
 
२) आता ही वेळ आहे, सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याची.
बाजारात अनेक प्रकारचे सराव प्रश्नपत्रिकेचे पुस्तक मिळते, ते आणून त्यातील प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. पण कशा तर, पाचही सराव प्रश्नप्रत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवावा, म्हणजे बीजगणितातील पहिल्या प्रश्नात आठ प्रश्न असतात, तर ते
आठच्याआठ मिळून चाळीस होतात, तर ते सर्व सोडवावेत. अशाप्रकारे दुसरा, तिसरा सर्व सोडवावे. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा.
 
 
३) भाषेच्या निबंधात विषय ठरवावा, आणि संध्याकाळी निबंध वाचावेत. पुन्हापुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. गणिताचा अभ्यास करताना, गणिते सोडवायला वेळ नाही, तर गणिते फक्त वाचावीत आणि रीती समजावून घ्याव्यात. सायन्सच्या आकृत्यांचा सराव करावा. पण हे सर्व संध्याकाळी सहा ते नऊपर्यंतच करावे.
 
 
४) एक मास्टर वही बनवावी. त्यात गणिताची सूत्रे, सायन्समधील सूत्रे, आकृत्या, महत्त्वाचे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे ऐनवेळेस पुस्तकात शोधावे लागणार नाही.
 
 
५) भूमितीचे प्रमेय पोपटपंचीप्रमाणे पाठ न करता ते समजावून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या पाचतरी प्रश्नपत्रिका सोडवाव्या.
६) लेखनाची प्रॅक्टिस देखील करावी. संस्कृत विषयाचे श्लोक त्याचे अर्थ समजून पाठ करावे.
 
 
- चंद्रशेखर पाटील
मुख्याध्यापक , बी.यु. एन.
रायसोनी मराठी मिडीयम शाळा, जळगाव
 
 
१२वीची परीक्षासुध्दा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करावे.
 
 
आर्टस्
आर्टस्ला बहुतांश थियरी विषय असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी लेखनाचा आणि वेळेत पेपर पूर्ण करण्याचा सराव करावा. डोकं शांत ठेवून अभ्यास करावा आणि पेपर लिहावा.
 
 
कोणत्या पाठांना किती मार्क्स आहेत, हे आधी पहावे. त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करावी. ज्या भागाला अधिक मार्क्स असतील, त्यांचा अभ्यास आधी करावा. अधिक मार्क्स असलेला एखादा पाठ कठीण वाटत असल्यास तो सोडून दिला तरी चालेल; मात्र त्याचे ऑब्जेक्टिव्हज् केलेच पाहिजे.
 
 
कॉलेजचा अभ्यासक्रम आता पूर्ण झाला असेल. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोट्स काढाव्यात. ज्या पाठांना अधिक मार्क्स असतील, त्याची मोठी उत्तरे लिहून काढावीत. ती उत्तरं १२ मार्कांसाठी लिहायची असतात. ती नीट तयार करावीत. दोनपैकी एक मोठं उत्तर लिहा, असा हा प्रश्न असतो.
 
 
उत्तर तयार करताना सगळे मुद्दे, उपमुद्दे हेडिंगसह लिहावेत. उत्तर लिहिताना हे मुद्दे ठळक करावेत किंवा त्यांना अधोरेखित करावे. जेणेकरून लिहिलेला पेपर पुन्हा तपासताना आपण सर्व मुद्दे लिहिले, की नाही हे कळेल व पेपर तपासणार्‍यांनादेखील सोयीचे होते.
 
 
उत्तर लिहिताना इण्ट्रो, कण्टेण्ट आणि कन्क्ल्यूजन असे तीन भाग असावेत. त्याची तयारी सुरुवातीपासूनच करावी म्हणजे सवय लागते आणि परीक्षेच्यावेळी विशेष लक्षात ठेवावं लागत नाही. उत्तरातील मुद्दे लक्षात ठेवावे. पेपर लिहिताना ते स्वत:च्या मनाने विस्तृत करता येतात.
 
 
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. हातात असलेला वेळ आणि राहिलेला अभ्यास याचं प्रमाण पाहून वेळापत्रक ठरवा. भाषांचा अभ्यास करताना व्याकरणावर भर द्या, ते पक्के करा.
 
 
कोणताही विषय असो; उत्तर सोप्या इंग्रजी भाषेत लिहा.
जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा आणि परीक्षा द्या. कॉलेज किंवा क्लासमधील सर्व परीक्षा द्या. परीक्षांमुळे सराव होतो, आत्मविश्वास वाढतो, लिहिण्याचा वेग वाढतो आणि हस्ताक्षर सुधारतं. जे विद्यार्थी अधिक पेपर सोडवतात, ते परीक्षेच्यावेळी रिलॅक्स असतात. दर परीक्षेत आपले मार्क्स वाढत आहेत अथवा नाही, याकडे लक्ष द्या.
 
 
इतिहासाचा अभ्यास करताना ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्यावर भर द्यावा. पॉलिटिकल सायन्समध्ये आकडेवारी, उदाहरणार्थ : कलम, सन, लोकसभेची सदस्यसंख्या, वयोमर्यादा आदींवर भर द्यावा. सोशिओलॉजीमध्ये कारणं, परिणाम, उपाय, वैशिष्ट्ये, समस्या यावर भर द्यावा.
 
 
कॉमर्स
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना थियरी विषयांचे वावडे असते. त्यात इकॉनॉमिक्स हा विषय म्हणजे मुलांचा नावडता, पण कम्पलसरी असतो. या विषयाचा पेपर लिहायचाच आहे आणि उत्तम मार्क्स मिळवायचे आहेत, हे मनाशी पक्क केलं, की बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील. इकॉनॉमिक्स हा विषय थियरीचा असला, तरी काही गोष्टी समजावून घेतल्या की स्वत:च उत्तरं लिहिता येतात. त्यातील कन्सेप्ट्स आणि थिअरीज समजून घेतल्या पाहिजे. डायग्राम्स पुन्हा पुन्हा काढून प्रॅक्टिस केली पाहिजे.
 
 
इकॉनॉमिक्ससारखेच इंग्रजी आणि एसपी हे विषय विद्यार्थ्यांना जड जातात. बरेच विद्यार्थी एसपी आणि इकॉनॉमिक्समध्ये अपयशी होतात. त्यामुळे त्यांनी या तीन विषयांवर भर द्यायला हवा. इंग्रजी ही भाषा सक्तीची आहे. त्यामुळे तिचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी सुरू करावा.
 
 
इंग्रजीचं वाचन वाढवायला हवं. व्याकरण कच्चे असल्यास ते सुधारा. आता संपूर्ण अभ्यास हा परीक्षेच्यादृष्टीनेच केला पाहिजे. तरच परीक्षेत उत्तम गुण मिळतील.
 
 
बारावीचा अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी बदलला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ दोनच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता येईल. आधीच्या दोन वर्षांचे पेपर वाचून आणि सोडवून पाहावेत. आता शक्य तितका भर पेपर सोडवण्यावर द्यावा. पेपर सोडवताना आपली किती तयारी बाकी आहे, हे लक्षात येते आणि आत्मविश्वास वाढतो. पेपरमधील न आलेल्या प्रश्नांची तयारी करता येईल.
 
 
दहावीनंतर विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली असते. इंग्रजी आणि इकॉनॉमिक्ससारख्या विषयांचे पेपर वेळेवर लिहून होत नाहीत. अनेकदा उत्तरं येत असूनही वेळ कमी पडतो आणि पेपर अर्धवट राहतो. यासाठी आत्तापासून घड्याळ लावून पेपर लिहिण्याची सवय करा.
 
 
डिसेंबर महिन्यापर्यंत कॉलेजचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतो. त्यामुळे वाट न पाहता झालेले पाठ तयार करा. कठीण वाटणार्‍या विषयांवर विशेष भर द्या. वर्गात पेपर सोडवताना जितके गांभीर्य असते, तितके घरी पेपर सोडवताना दिसत नाही. त्यामुळे क्लास आणि कॉलेजच्या प्रिलिम परीक्षा आवर्जून द्याव्यात.
 
 
सायन्स
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रिव्हिजनवर भर दिला पाहिजे. अभ्यासाची नियमित वेळ ठरवून घ्यावी. केवळ अभ्यास एके अभ्यास असं न करता अधूनमधून ब्रेक घ्यावा. शरीराचं चलन वलन झालं, की रक्ताभिसरण चांगलं होतं.
एकच विषय चार तास घेऊन बसण्यापेक्षा वेगवेगळे विषय किंवा एकाच विषयातील वेगवेगळे पाठ अभ्यासावेत. आधीच्या वर्षांचे पेपर सोडवावेत. त्यामुळे सराव होतो, परीक्षेची पद्घत आणि पॅटर्न समजतो.
 
 
टाइम मॅनेजमेण्ट महत्त्वाचं आहे. ठरलेल्या वेळेत पेपर सोडवण्याचा आणि पूर्ण करण्याचा सराव करावा. १० मार्कांच्या उत्तराला किती वेळ द्यावा, हे ठरवा आणि तितक्याच वेळात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्या उत्तराला अधिक वेळ गेल्यास पुढील सगळे वेळापत्रक बिघडू शकते. घड्याळ लावून, वेळेचं भान ठेवून पेपर लिहिण्याची सवय करावी. दिवसाचे ४-५ तास नीट अभ्यास पुरेसा आहे. आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन अभ्यास करा.
 
 
सायन्सचे विद्यार्थी भाषांना कमी महत्त्व देतात. ते योग्य नाही. त्यांनी भाषांचा अभ्यासही नीट केला पाहिजे. भाषेचा पेपर लिहिताना वेळ कमी पडतो. त्यामुळे मोठी उत्तरं, निबंध यांचा सराव करावा.
 
 
विद्यार्थ्यांनी शक्यतो रोज योग, मेडिटेशन, प्राणायाम करावे. यामुळे एकाग्रता वाढते. सीईटीची परीक्षा बर्‍याचअंशी बारावीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असते. त्यामुळे बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास पक्का केल्यास त्याचा मोठा फायदा सीईटी परीक्षेतही होईल.
 
 
शिक्षकांनी हे करावे
प्रिलिम झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे काही दिवस असतात. या काळात विद्यार्थ्यांचे पॉलिशिंग करावे. परीक्षेच्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी करावी. विद्यार्थी कुठे कमी पडत असतील, तर त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करावे.
 
- प्रा. शामकांत बाविस्कर,
डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालय