करियर: व्यापक कल्पना
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
मानव संसाधन व्ययस्थापनाच्या अभ्यासक्रमात वापरल्या जाणाऱ्या ‘SWOT Analysis’ या तंत्राचा मुलांना लहानपणापासून वापर करायला शिकवता येईल. स्वतःची बलस्थाने, कमतरता, मिळालेल्या संधी आणि आपल्यापुढील आव्हाने यावर मुलांशी चर्चा व्हायला हवी. त्यातून ती स्वतःकडे आणि आपल्या स्वप्नांकडे जास्त वास्तववादीपणे पाहू लागतात.
 
तुम्हाला कुठल्या समस्या सोडवायच्या आहेत? असे मी करिअर मार्गदर्शनाच्या कार्यशाळेमध्ये मुलांना विचारले. मुले सुरुवातीला संभ्रमित झाली. मग एक एक करत वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, देशपातळीवरील, जागतिक, वैश्विक अशा अनेक समस्यांबद्दल मुलांनी बोलायला सुरुवात केली. या प्रश्नाने सुरु झालेले Goal settingचे सत्र जास्त अर्थपूर्ण झाले. ‘मला वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक दृष्टीने काय साध्य करावेसे वाटते?’; ‘भवतालची सद्य व भविष्यातील परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने माझे योगदान काय असेल?’; ‘माझी जीवनशैली कशी असावी?’; ‘माझ्या आयुष्यातले महत्वपूर्ण उद्दिष्ट काय आहे?’; ‘माझे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये मला कुठल्या अडचणी येऊ शकतील?’ अशा प्रश्नांचा विचार करिअरचा मार्ग आखताना व्हायला हवा. मुले लहान असतात, तेव्हापासून ‘तू मोठेपणी कोण होणार?’ या प्रश्नाला जी वेगवेगळी उत्तरे देतात ती बहुतांश खूप स्वप्नाळू अशी असतात. परंतु, पालकांनी, शिक्षकांनी त्या उत्तरांना महत्व देऊन त्याबाबत विश्लेषणात्मक प्रश्न मुलांना विचारावेत. यातून मुलांचे विचार ‘कोण?’कडून ‘कशासाठी?’च्या दिशेने वळू शकतात. कारण ‘कोण होणार?’ या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपूजेतून निर्माण झालेले असू शकते. पण ‘कशासाठी?’ या प्रश्नाच्या उत्तरातून स्वतःच्या गुणांचा, कौशल्याचा, मूल्यांचा, हेतूचा विचार सुरु होऊ शकतो. मानव संसाधन व्ययस्थापनाच्या अभ्यासक्रमात वापरल्या जाणाऱ्या ‘SWOT Analysis’ या तंत्राचा मुलांना लहानपणापासून वापर करायला शिकवता येईल. स्वतःची बलस्थाने, कमतरता, मिळालेल्या संधी आणि आपल्यापुढील आव्हाने यावर मुलांशी चर्चा व्हायला हवी. त्यातून ती स्वतःकडे आणि आपल्या स्वप्नांकडे जास्त वास्तववादीपणे पाहू लागतात.
 
करिअरच्या अनेकविध संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत, नवनवीन संधी निर्माण करणे शक्य झाले आहे. अशावेळी करिअरचा विचारही नाविन्यपूर्ण पद्धतीने करणे गरजेचे आहे. ठाण्याच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ या संस्थेतर्फे गेल्या २५ वर्षांपासून ‘वेध’ नावाचा एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम ठाण्यात आणि इतर अनेक शहरांतून चालवला जातो. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात; त्यातून त्यांच्या करिअरचा प्रवास जाणून घेतला जातो. त्यांची विचारप्रक्रिया, यशापयशाचे प्रसंग, जिद्दीच्या कहाण्या, घेतलेले कष्ट, जपलेली मूल्ये, टीमवर्क अशा गोष्टींतून त्यांचे करिअर प्रेक्षकांमधल्या तरुणाईपुढे उलगडत जाते. अशा कार्यक्रमांसारख्या संधी मुलांना आवर्जून उपलब्ध करून द्याव्यात. त्यातून करिअर या संकल्पनेबाबत केवळ मुलांचीच नाही तर पालकांची दृष्टीही व्यापक होते. करिअरच्या संधी जितक्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत तितकीच प्रत्येक क्षेत्रात स्पर्धाही खूप वेगाने वाढते आहे. अशावेळी अनेक कारणांमुळे हवी ती संधी न मिळणे, करिअरचा वेगळा मार्ग स्वीकारावा लागणे, हे काही तरुणांच्या बाबतीत होते. अशावेळी लहानपणापासूनची ‘माझे उद्दिष्ट काय?’ या प्रश्नावर बेतलेली विचारप्रक्रिया कामी येते. ‘काही कारणांमुळे करिअरचा जो मार्ग मला स्वीकारावा लागला आहे त्यातून मला माझे उद्दिष्ट कसे साध्य करता येईल?’ हा विचार जास्त सकारात्मकतेकडे, रचनात्मकतेकडे नेऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर ‘इंजिनियर होणे’ हे माझे साध्य असू शकत नाही, ते साधन आहे. ‘इंजिनियरिंगच्या माध्यमातून मला वैयक्तिक, सामाजिक, जागतिक पातळीवर काय साध्य करायचे आहे?’ हे महत्वाचे आहे. मानसशास्त्राच्या क्षेत्रात काम करायचे हे मी शाळेत असतानाच ठरवले होते. परंतु, माझ्या पालकांनी ११-१२ वी मध्ये मी शास्त्र शाखेचा अभ्यास करावा असा आग्रह धरला. आमच्यामध्ये चांगला संवाद होता त्यामुळे त्यांच्या विचारांना मान देऊन मी तो मान्य केला. आणि करिअरच्या मार्गावरील या निर्णयाचा मला खूप व्यापक फायदा झाला. कला व शास्त्र याचा सुरेख संगम असणाऱ्या मानसशास्त्र या क्षेत्रामध्ये शिक्षण घेताना व काम करताना ११-१२ वीमध्ये विकसित झालेल्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा आजही खूप फायदा मला जाणवतो. करिअरचा मार्ग आपण निवडलेला असो की स्वीकारलेला असो, त्यावर चालताना बौद्धिक कौशल्यांबरोबरच भावनिक समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे हे तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
- गुंजन कुलकर्णी