बलुचिस्तान; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
इस्लामाबाद:
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी ताज्या असतानाच पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात 9 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला.
 
द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. तुरबत आणि पंजगुर यांच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान पोहोचण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.
 
 
बलुच राजी अजोई संगरमध्ये तीन संघटनांचा समावेश होतो. बलुच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुच रिपब्लिकन गार्ड या बलुच राजी अजोई संगरचा भाग आहेत. स्वतंत्र बलुचिस्तान ही या संघटनांची मागणी आहे. आमच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गस्ती पथकावर आणि त्यांच्या तळावर एकाच वेळी हल्ला केला, अशी माहिती बलुच राजी अजोई संगरचे प्रवक्ते बलोच खान यांनी दिली.