किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता २४ फेब्रुवारीला
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019
नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ७५,००० कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे २४ फेब्रुवारी रोजी एक कोटी लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन केला आहे, अशी माहिती कृषिमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने आज गुरुवारी दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा २०१९-२० च्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली असूून, याअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन धारण करणार्‍या देशभरातील १२ कोटी लहान शेतकर्‍यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जाणार आहेत. गोरखपूर येथे २४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या शेतकर्‍यांच्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी या योजनेचा औपचारिक शुभारंभ करतील. पीएम-किसान पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती २४ फेब्रुवारीपर्यंत टाकली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पहिला हप्ता वितरित केला जाईल. शेतकरी लाभार्थ्यांना दुसरा हप्ता १ एप्रिल रोजी दिला जाईल, असेही या अधिकार्‍याने सांगितले. पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांनाही पहिला हप्ता दिला जाईल का, या प्रश्‍नाला उत्तर देताना अधिकार्‍याने सांगितले की, अयोग्यता आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे पात्र शेतकरी त्यांना मिळणार्‍या फायद्यापासून वंचित राहणार नाही, हेच मूळ तत्त्व आहे.