विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी व्यसनांपासून दूर राहावे
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

‘युवारंग युवक महोत्सव’ उद्घाटनप्रसंगी ना. गिरीश महाजन यांचा सल्ला

 

 
 
जळगाव, १४ फेब्रुवारी
सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली असून जिद्द व मेहनतीशिवाय यश प्राप्त होणे शक्य नाही. त्यामुळे ज्योतिषावर विश्वास न ठेवता परिश्रम करा आणि व्यसनांपासून दूर राहा, असा सल्ला वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करताना कलावंत विद्यार्थ्यांना दिला.
 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला गुरुवार, १४ फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या प्रांगणात प्रारंभ झाला. सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटन ना. महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील होते. मंचावर आ. सुरेश भोळे, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्य. प. सदस्य दिलीपदादा पाटील, कुलसचिव भ. भा. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे, समन्वयक प्रा. अजय पाटील उपस्थित होते.
 
 
ना. महाजन यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. ना. महाजन म्हणाले की, जेव्हा मला पुरुष पात्र मिळाले तेव्हा पुढार्‍याची भूमिका मिळाली. ती भूमिका आजतागायत वठवत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना सात वर्ष विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पुढे ग्रामपंचायत आणि पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो. मी क्रीडापटू होतो, मात्र राजकारणात करिअर करायचे हा निर्धार पक्का होता आणि त्यात यश प्राप्त होत गेले. तेव्हा तरुण पिढीनेदेखील ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते क्षेत्र निवडल्यानंतर जिद्द आणि मेहनत करावी म्हणजे यश प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी जिल्हावार युवक महोत्सवाच्या आयोजनामुळे महाविद्यालयांच्या सहभागात वाढ झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढली आहे, असे मत व्यक्त केले. पुढील शैक्षणिक वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यार्थी साहित्य संमेलन घेतले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विद्यापीठात लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली.
 
 
आ. सुरेश भोळे यांनी अशा महोत्सवातून विद्यार्थ्यांना कलागुण सादरीकरणाची संधी प्राप्त होते. शिक्षण घेत असताना अशा कला जोपासल्या तर त्याचा भविष्यात फायदा होतो, असे सांगून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हा महोत्सव होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दिलीपदादा पाटील यांनी भाषणात जिल्हावार महोत्सवांमुळे छोट्या महाविद्यालयांमध्ये समूह नेतृत्व विकसित होत आहे, असे सांगितले. या महोत्सवामधून सुजाण नागरिक निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 
प्रारंभी विद्यार्थी विकास संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. वर्षा उपाध्ये या विद्यार्थिनीने महोत्सवाची सामूहिक प्रतिज्ञा दिली. तळोदा येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आदिवासी बोलीभाषेतील स्वागत गीत सादर केले. बी. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव, रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव, कुसुंबा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा या चार महाविद्यालयांनी जिल्हावार युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल या महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी, डॉ.आशुतोष पाटील, प्रा.जतीन मेढे यांनी केले. प्रा.अजय पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य उपस्थित होते.
 
 
उद्घाटनानंतर सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा ऍण्ड नॅचरोपॅथीचे पंकज खासबाग यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाचे सादरीकरण केले. त्यानंतर प्रवीण माळी यांचा ‘आयतं पोयतं सखानं’ हा एकपात्री प्रयोग सादर झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या महोत्सवात ३१० विद्यार्थिनी आणि २८६ विद्यार्थी यांचा समावेश आहे. याशिवाय साथसंगत करणारे कलावंत आणि संघव्यवस्थापक दोनशेपेक्षा अधिक आहेत.
  
 
प्रत्यक्ष स्पर्धांना उद्यापासून सुरुवात
प्रत्यक्ष स्पर्धांना शुक्रवारी सकाळी ८ वा.पासून प्रारंभ होणार आहे. स्टेज क्र.१ दीक्षांत सभागृहात मिमिक्री, मूकनाट्य, विडंबन व समूह लोकनृत्य या स्पर्धा होतील. स्टेज क्र. २ म्हणजे सिनेट सभागृहात भारतीय लोकगीत, सुगम गायन (पाश्चिमात्य), सुगम गायन (भारतीय), समूहगीत (भारतीय) व भारतीय लोकसंगीत या स्पर्धा होणार आहेत. रंगमंच क्र. ३ अर्थात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवनात शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन (सूरवाद्य), समूह गीत (पाश्चिमात्य), शास्त्रीय नृत्य व शास्त्रीय वादन (तालवाद्य) या स्पर्धा होतील. रंगमंच क्र. ४ म्हणजे सामाजिक शास्त्र प्रशाळा सभागृहात काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा होणार आहेत. रंगमंच क्र. ५ व ६ हे विद्यापीठाच्या ग्रंथालयात राहणार असून याठिकाणी रांगोळी, क्ले-मॉडेलिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, मेहंदी, कोलाज, स्पॉटपेंटिंग, व्यंगचित्र आणि चित्रकला या स्पर्धा होणार आहेत.