आर.आर.विद्यालयाच्या शिक्षकाला मारहाण
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
जळगाव, १४ फेब्रुवारी
शहरातील विजयनगरात दोन ते तीन तरुणांनी आर.आर. विद्यालयाचे शिक्षक गिरीश रमनलाल भावसार (वय ४५) यांची दुचाकी थांबवून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. दरम्यान भावसार यांच्या नाकाला जबर मार लागला आहे.
 
 
खोटेनगर येथे वास्तव्यास असलेले गिरीश भावसार हे आर.आर.विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून ८ वी व १० वीतील मराठी, समाजशास्त्र विषय शिकवितात. ते नेहमीप्रमाणे शाळेतून आपल्या दुचाकीने (एम.एच. १९, ए.क्स. -८०५७) गावात जात होते. दरम्यान, विजयनगरातील स्टेशनरी दुकानासमोर दोन मुले उभे होते. त्यातील एकाने लाल रंगाचा शर्ट घातलेला असून तोंडाला रुमाल लावलेला होता. भावसार येथून जात असताना दोघांनी त्यांचा हात धरून तोंडाला बुक्का मारला. दरम्यान, ते गाडीवरून खाली पडले, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. दरम्यान, शेजारील नागरिक त्यांच्या मदतीला आले असता दोघे तेथून पळून गेले. भावसार यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांच्या नकाच्या हाडाला खंबीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार ते खासगी रुग्णालयात दाखल झाले.
 
 
तरुण सीसीटीव्हीत कैद
पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्यांनीच मारहाण केल्याची चर्चा असून जिल्हापेठ पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मारहाण करणारे तरुण एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. काही महिन्यांपूर्वी आर.आर.विद्यालयातील कीर्तीकुमार शेलकर यांना शाळा परिसराच तरुणांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.