रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून ‘खाकी’त जुंपली
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

 रेल्वे सुरक्षा बलाकडून लोहमार्ग पोलिसांना असहकार; स्टेशन प्रबंधकांकडे तक्रार

 
पाचोरा, १४ फेब्रुवारी
जळगाव रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यात सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यावरून लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलात चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. गुन्ह्याच्या तपासाकामी तसेच विविध कामांसाठी फुटेज दाखविण्यासंदर्भात वारंवार लोहमार्ग पोलिसांकडून लेखी पत्राची मागणी केली जात असून लोहमार्ग पोलीस व जिल्हा पोलीस दलाला सापत्न वागणूक देणार्‍या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचार्‍याविरोधात लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्राचे चिंतामण व्ही. आहेर यांनी जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
 
 
या निवेदनात म्हटले आहे की, सीसीटीव्ही फुटेजचा डीस्प्ले व फुटेज सेवा डाटा कार्यालय हे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान चोरी अथवा इतर कारणांसाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांकडून लोहमार्ग पोलिसांकडून फुटेज दाखविण्याबाबतचे पत्र आणण्याबाबत सांगितले जाते व फुटेज दाखविण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली जाते.
 
 
प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोहमार्ग पोलीस कर्मचारी स्वतः तक्रारदाराला घेऊन कार्यालयात गेले असता रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी लोहमार्ग पोलिसांनाही लेखी तक्रार घेऊन या तसेच फुटेज दाखविण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आणा, असे सांगून प्रवाशांप्रमाणेच लोहमार्ग पोलिसांना वागणूक देऊन परत पाठविले जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
 
जिल्हा पोलीस दलाची अडवणूक
गुन्ह्याच्या तपासकामी, बेपत्ता इसम, आरोपीचा शोध कामी जिल्हा पोलीस दलाला रेल्वेस्थानकावरील फुटेज महत्त्वाचे असतात. मात्र, जिल्हा पोलीस दलालाही लोहमार्ग पोलीस विभागाचे लेखी पत्र घेऊन या, असे सांगितले जाते. तसेच फुटेज दाखविण्याबाबत अडवणूक केली जात आहे. तरी संबंधित प्रकरणाबाबत खुलासा करण्यात यावा, यंत्रणा कोणासाठी व कशासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, याचे उत्तर मिळावे, असे पोलीस निरीक्षक चिंतामण व्ही.आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.