न्हावीत मोबाईल टॉवर ‘सील’
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :14-Feb-2019

महसूल विभागाची कारवाई; सात दिवसांच्या वाढीव मुदतीनंतरही थकबाकीच

 

 
 
न्हावी, ता. यावल, १३ फेब्रुवारी
परिसरातील मोबाईल टॉवर कंपन्यांना ७ दिवसांची वाढीव मुदत देऊनही ७३ हजार ३६० रुपयांची महसूलची बाकी न भरल्याने वोडाफोन, एअरटेल, इंडस टॉवर या मोबाईल कंपन्यांचे टॉवर पुन्हा १३ रोजी महसूल विभागाने सील केले. त्यामुळे परिसरातील मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल आहे.
 
 
न्हावी परिसरात ५ मोबाईल टॉवर असून त्यापैकी मुदतीत केवळ एक मोबाईल टॉवरने बिनशेती सारा तसेच अनधिकृत दंड रक्कम भरणा केला होता. उर्वरित वोडाफोन, एअरटेल, जीटीएल आणि रिलायन्स या टॉवरची महसूल थकबाकी भरण्यात आलेली नसल्याने यावल येथील तहसीलदार कुंदन हिरे यांच्या स्वाक्षरीची शास्तीची नोटीस बजावून महसूल रक्कम भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. यापूर्वी मुदतीत ही रक्कम न भरल्याने ३१ जानेवारी रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले आणि यावल तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर मंडल अधिकारी जे.डी.बंगाळे, तलाठी लीना राणे, तलाठी एस.एस.खान, तलाठी एस.टी. कोळी यांनी टॉवर सील केले होते.
 
 
त्यानंतर तत्काळ जीटीएल आणि रिलायन्स या कंपनीने प्रत्येकी ३६ हजार ६८० भरणा केल्याने त्यांचे शील काढण्यात आले तसेच वोडाफोन, एअरटेल, इंड्स टॉवर या कंपनीच्या व्यवस्थापकांनी तहसीलदार हिरे यांच्याकडेही लेखी स्वरुपात मागणी करून भरणा करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली होती.
 
 
त्यानुसार हिरे यांनी टॉवरला महसूल रक्कम भरणा करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. मात्र, दिलेल्या मुदतीत महसूल भरणा न केल्याने बुधवारी दुपारी फैजपूर मंडल अधिकारी जे.डी. बंगाळे, तलाठी लीना राणे, तलाठी एफ.एस.खान यांनी मोबाईल कंपन्यांचे टॉवर सील केले. त्यामुळे न्हावी परिसरात मोबाईल नेटवर्क बंद पडले आहेत. मोबाईल कंपन्यांची महसूल रक्कम भरणा न भरल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.