जैन इरिगेशनला ९१.५ कोटींचा करपश्चात नफा
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :14-Feb-2019

२०१८-१९ तिसर्‍या तिमाहीचे लेखापरिक्षण न केलेले निकाल जाहीर

 
 
जळगाव, १३ फेब्र्रुवारी
भारतातील कृषी व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तिसर्‍या तिमाहीचे (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. तिसर्‍या तिमाहीचा अर्थात नऊ महिन्यांचा कर, व्याज व घसारापूर्व नफा १३.९७ टक्क्यांनी वाढून ते ८२१.३ कोटी रूपये व तिसर्‍या तिमाहीचा कर, व्याज व घसारापूर्व नफा २७२.२ कोटी रूपये जैन इरिगेशनने साध्य केला. तिसर्‍या तिमाहीचा करपश्चात नफा ३६ टक्क्यांनी वाढून तो ९१.५ कोटी रूपये तर नऊ महिन्यांचा करपश्चात नफा १९८.१ कोटी रूपये कंपनीने नोंदवला आहे.
 
 
निकालांची ठळक वैशिष्ट्ये
एकीकृत उत्पन्नात तिसर्‍या तिमाहीत ९.२२ टक्कयांची वाढ होऊन ते २०३७.७ कोटी रूपये इतके झाले. तिसर्‍या तिमाहीत एकल उत्पन्न ८.८४ टक्क्यांनी वाढून ते १०९८.५ कोटी रूपये झाले. तिसर्‍या तिमाहीत एकीकृत कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात ७.९१ टक्क्यांनी वाढ झाली व तो २७२.२ कोटीपर्यंत पोहोचला. तिसर्‍या एकल कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात १०.५६ टक्के वाढ होऊन तो २०१.१ कोटी रूपये नोंदवला. तिसर्‍या तिमाहीत एकीकृत करपश्चात नफा ३५.९५ टक्क्यांनी वाढून तो ९१.५ कोटी रूपये झाला तर तिमाहीत करपश्चात एकल नफा २.६३ टक्क्यांनी घटून ६३ कोटी रूपये झाला. कंपनीकडे ५१९२.८ कोटी मागणी प्राप्त झाली आहे.
 
 
तिसर्‍या तिमाहीचा आणि ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपणार्‍या ९ महिन्यांचा आर्थिक निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. तिसर्‍या तिमाहीत जैन इरिगेशनने भारत आणि भारताबाहेरील व्यवसायात आणि नफ्यात अपेक्षित वाढ नोंदविली. खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला खात्री आहे की, त्यामुळे येणार्‍या तिमाहींमध्ये नफ्यावर सकारात्मक परिणाम होईल. या कठीण काळात कंपनी व्यवस्थापन शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनी पर्यावरण, समाज आणि प्रशासन (ईएसजी) आदी घटकात प्रभावी नेतृत्व करीत आहे. यासाठी शेतकर्‍यांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास कंपनीने मिळवला आहे. शाश्वततेचे लक्ष्य कंपनी साध्य करेल. उर्वरित काळात आम्ही आमची लक्ष्ये साध्य करण्याबाबत सकारात्मक वाटचाल करू आणि विविध व्यवसायात व विविध भौगोलिक क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदवू.
 
- अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.