जामनेरच्या राहुल चव्हाण यांची जलसंसद युवा पुरस्कारासाठी निवड

    दिनांक : 09-Dec-2019
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील राहुल चव्हाण यांची दिल्ली येथे या महिन्यात वितरित होणाऱ्या मराठवाडा जलसंसद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. आज ९ डिसेंबर रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यामुळे राहुल चव्हाण यांच्यावर जळगाव जिल्ह्यासह जामनेर येथून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एम्सतर्फे या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



ल_1  H x W: 0 x
 
राहुल चव्हाण गेली १५ वर्षांपासून विविध चळवळी तसेच आंदोलनात सक्रिय राहिले आहेत. मागील पाच वर्षांपासून त्यांनी स्वतःला जलविषयक प्रकल्प व नियोजन याविषयीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. बी.ए. चे शिक्षण पूर्ण करून राहुल चव्हाण संघाचे पूर्ण वेळ प्रचारक निघाले आहेत. २०१७-१८ मध्ये लातूर जिल्ह्यात जी जलक्रांती झाली त्यात राहुल चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे. खेडोपाडी जाऊन युवकांना त्यांनी जल प्रकल्पांची माहिती देऊन त्यांना आपल्या सोबत सामील करून घेतले. त्यामुळे या तरुणांनीही जलक्रांती साकार करण्यात स्फूर्तीने सहभाग घेतला. तसेच वनवासी व डोंगराळ भागात स्वयंस्फूर्तीने व युवा सहभागाने त्यांनी वन्य प्राण्यांसाठी अनेक पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही वन्य जीवांची तहान या पाणवठयाद्वारे भागत असते.
 
 
राहुल चव्हाण मूळचे जामनेर (जि.जळगांव) येथील रहिवासी आहेत. ते अगदी लहानपणापासून रा.स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. घरात राष्ट्रीय विचारांचे वातावरण असल्यामुळे त्यांनी बालपणापासून विविध सामाजिक कार्यात व उपक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात केली. आयोध्येतील शिलान्यास आंदोलन, गो-ग्राम स्वाक्षरी अभियान, तरुणींमध्ये राष्ट्र प्रबोधनपर कार्यक्रम, २००७ मध्ये झालेल्या अभाविपच्या मंत्रालयावरील धडक मोर्चा अश्या अनेक आंदोलनात व सामाजिक कार्यात त्यांनी नेतृत्व केले आहे. मातृभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ३ बचतगट, २१ संस्कार वर्ग, २ अभ्यासिका तालुक्यात त्यांनी सुरु केलेले आहे. तालुक्यातील युवा तरुणांना उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन करत सोबत घेऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी श्री उद्योग समुहाच्या माध्यमातून ते आज कार्य करत आहे.
 
 
पुरस्काराचा मानकरी केवळ मी नव्हे, तर सर्व समाज - राहुल चव्हाण
 
 
राहुल चव्हाण यांच्याशी जळगाव तरुण भारत ने संपर्क साधला असता केवळ मी एकटा या पुरस्काराचा मानकरी नसून जलक्रांतीत स्वतःला वाहून घेणारा समस्त समाज या पुरस्काराचा मानकरी असल्याचे त्यांनी सांगितले. मला संघ कार्यकर्त्यांनी उभं केलं. समाजोपयोगी राष्ट्रकार्यात सक्रिय केलं. मला मित्रबंधु किरण चौधरी व रामानंदजी काळे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मी त्या सर्वांचा ऋणी असून आपण समाजाचं देणं लागतो हा विचार संघाच्या शाखेत शिकलो आहे. त्यामुळे हा पुरस्कार केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कसल्या पुरस्काराची अपेक्षा न बाळगता समाजकार्य करत आलो आहे व पुढेही करत राहीन अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच लोकसभागातून अशक्यप्राय वाटणारे कार्य सहज पूर्ण होऊ शकते हे लातूरकरांनी सिद्ध करून दाखवले आहे. युवा वर्ग देशहितासाठी पुढे आला तर आव्हान, संघर्ष, प्रयत्न हे सगळे शब्द बापुडे ठरतात व केवळ विजय हाच शब्द शाश्वत ठरतो असे सांगत युवाशक्तीचे महत्व त्यांनी विशद केले.